Thu, Sep 19, 2019 03:28



होमपेज › Pune › मंत्री जानकरांकडे खंडणी मागणार्‍यांवर 'मोक्का'

मंत्री जानकरांकडे खंडणी मागणार्‍यांवर 'मोक्का'

Published On: May 22 2019 3:18PM | Last Updated: May 22 2019 3:30PM




बारामती : प्रतिनिधी

राज्याचे दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील 13 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. याशिवाय इंदापूर तालुक्यातील सोमा राऊत गॅंगवरही मोक्कांतर्गत कारवाई झाली.

जानकर प्रकरणात सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय 30, रा. पिलिव, पडळकरवस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर), डाॅ. इंद्रकुमार देवराज भिसे (वय 42, रा. पेरीयार भवन, खरामळा, ता. शिरुर, जि. पुणे), दत्तात्रय पांडूरंग करे (वय 34, रा. करेवस्ती, सदाशिवनगर, ता. माळशिरस), विकास शिवाजी अलदर (वय 34, रा. आडेगाव, ता. माढा), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय 26, रा. माळेगाव, ता. माढा) , बिरुदेव लक्ष्मण कारंडे (वय 23, रा. माळेगाव, ता. माढा ), सुशांत दादासाहेब करे (वय 19, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा), दिपक विठ्ठल जाधव (वय 21, रा. वडजल, ता. माण), नितीन राजेंद्र पिसे (वय 23, रा. म्हसवड, ता. माण) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या 9 जणांसह जगन्नाथ जानकर ( रा. पळसावडे, ता. माण),  विनायक मासाळ व राजू अर्जून आणि रमेश कातुरे (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचा समावेश आहे. या चार आरोपींची पूर्ण नावे पोलिसांकडे नाहीत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

9 मे रोजी आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना बारामतीत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अण्णासाहेब बळवंत रुपनवर (वय 54, रा. कुरबावी, ता. माळशिरस) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी 4 मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हाॅटेलमध्ये तर 6 मे रोजी स्वारगेट येथील नटराज हाॅटेलात फिर्य़ादीला बोलावून ना. जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मिडियावर व्हायरल करू, दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू अशी भीती दाखवून फिर्यादीलाही त्या प्रकरणात गोवण्याची भिती दाखवली होती.

त्यापोटी पहिल्यांदा 50 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. तडजोडीअंती 30 कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यातील 15 कोटींचा पहिला हप्ता देताना बारामतीत आरोपींना पकडण्यात आले. या टोळीतील पडळकर विरोधात खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, सरकारी कामात अडथळा, डाॅ. भिसे विरोधात खंडणी, कट रचून खूनाचा प्रयत्न, करे विरोधात खंडणी, सरकारी कामात अडथळा, तर अलदर विरोधात चोरी, जगन्नाथ जानकर व राजू अर्जून यांच्यावर मारामारी, बेकायदा गर्दी जमाव जमवणे, व अन्य गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार मंजूरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.