Sun, Apr 21, 2019 00:39होमपेज › Pune › बलात्कार गुन्ह्यातील आरोपी पसार

बलात्कार गुन्ह्यातील आरोपी पसार

Published On: May 21 2018 1:35AM | Last Updated: May 21 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

चार कर्मचार्‍यांच्या रखवालीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्याच्या रखवालीसाठी असणार्‍या चार पोलिस कर्मचार्‍यांपैकी दोघे चहा पिण्यासाठी आणि एकजण लघुशंकेसाठी गेल्यानंतर तो पसार झाला आहे. विशेष म्हणजे हातातल्या बेड्या काढून तो पळाला आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्षय अशोक लोणारे (वय 21, रा. पोकळे मळा, कोंढवा बुद्रुक) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सचिन निकम (रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय लोणारे याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात 2015 साली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान अक्षय याला मानसिक आजार झाल्याने शनिवारी (दि. 19) ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर मनोरुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 26 मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या हातात बेड्या होत्या. दरम्यान अक्षय याच्या रखवालीची जबाबदारी शनिवारी सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत सुरक्षा गार्ड म्हणून पोलिस मुख्यालयातील कोर्ट कंपनीत नेमणुकीस असणारे फिर्यादी पोलिस नाईक निकम (बक्कल क्रं. 8413), शिपाई खेंदाड (बक्कल क्रं. 9963), पांचाळ (बक्कल क्रं. 10321) आणि कुंभार (बक्कल क्रं. 10437) यांच्यावर देण्यात आली होती. 

रविवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निकम आणि खेंदाड हे चहा पिण्यासाठी रुग्णालयाच्या कॅन्टींगमध्ये गेले. त्याचवेळी कुंभार हे लंघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेले होते. त्यावेळी पांचाळ एकटेच होते. त्यावेळी आरोपी अक्षय हा हातातील बेड्या काढून पांचाळ यांची नजर चुकून तेथून पसार झाला. पाचांळ यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सहकारी कर्मचार्‍यांना माहिती दिली. चौघांनी धावत-पळत ससून रुग्णालय तसेच रेल्वे स्थानक परिसराचा शोध घेतला. परंतु, अक्षय मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत. 

उपचारांसाठी यायचं अन् पसार व्हायचं

ससून रुग्णालय सध्या आरोपींसाठी पसार होण्याचे हक्काचे ठिकाण झाल्याचे दिसत आहे. न्यायालयीन तसेच पोलिस कोठडीत असणार्‍या आरोपींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यांच्या रखवालीसाठी पोलिस मुख्यालयीतल कोर्ट कंपनीतील कर्मचारीही तैनात असतात. मात्र, तरीही उपचारासाठी म्हणून आलेले आरोपी संधी साधून पसार होत आहेत. दोन महिन्यातून एखादी पसार होण्याची घटना घडत आहेत. यात पोलिसांचा हलगर्जीपणा तर समोर येत आहेच. पण, ससूनच्या सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र, या गोेंधळात आरोपींचे साधत आहे.