Sat, Jun 06, 2020 05:48होमपेज › Pune › ‘वायसीएम’ सुविधा वाढविणार

‘वायसीएम’ सुविधा वाढविणार

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 1:01AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात  पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टरांची पुरेशा प्रमाणात गरज भागणार आहे. तसेच, रुग्णांना चांगली सेवा देण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ते सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देत होते. ते म्हणाले की, डॉक्टरांची भरती प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. डॉक्टर मिळण्यासाठी वारंवार जाहिरात प्रसिद्ध केली जाते; परंतु, डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नाही. त्याचे कारण केवळ मानधन नाही. डॉक्टरांना कायमस्वरुपी नोकरीचे हमी दिली जात नाही. 

डॉक्टरांची कमतरता कमी करण्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. महाविद्यालय सुरू झाल्यास वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तयार होतील. त्यामुळे महाविद्यालय लवकरात-लवकर सुरु करण्यावर भर आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक विविध कक्षाच्या स्थापत्य विषयक कामांना नुकतीच सुरूवातही करण्यात आली आहे. 

वायसीएम रूग्णालयात मनोविकृती चिकित्सक पदासाठी डॉ. गौरव वडगावकर यांच्या निवडीस सभागृहाने मान्यता दिली. त्या विषयाला धरून सभेत वायसीएम व इतर रूग्णालय आणि डॉक्टरांची कमतरता या विषयावर चर्चा झाली. 

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी डॉक्टर निवडीची पद्धतीची विचारणा केली.  पुरेशा संख्येने डॉक्टरांची भरती झाली पाहिजे. वायसीएममध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. इतर जिल्हे व तालुक्यातून रूग्ण येतात. सत्ताधार्‍यांनी केवळ ‘टेन्डर’मध्ये गुरफटून राहू नये. वायसीएममध्ये डॉक्टर 1 व 2 वर्षे अनुभवासाठी येत, असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या डॉ. वैशाली घोडेकर यांनी मनोविकृती चिकित्सक घेतल्यानंतर त्याची औषधे आणण्यासाठी येरवडा रूग्णालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कमी मानधन असल्याने डॉक्टर वायसीएममध्ये येत नाहीत. भाजपचे माऊली थोरात यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अ‍ॅट्रॉॅसिटीचा गुन्हा दाखल झाला असून, पालिका त्यांच्यावर काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे. संदीप वाघेरे म्हणाले की, वायसीएमध्येसुमारे 35 ते 40 डॉक्टरांची कमतरता आहे. डॉ. रॉय व डॉ. साळवे यांचा वाद सुरू आहे. त्यात ही भरती का केली जात आहे. 

राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले की, भोसरी रूग्णालय खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक शुल्क घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, कमी मानधन असून, रूग्णालयातील दादागिरी व दबावामुळे डॉक्टर पदासाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पदे रिक्त राहत आहेत. डॉक्टराची पदे भरणे आवश्यक आहे. तसेच, आवश्यक यंत्रसामुग्री घ्यायला हवी. डॉक्टरांच्या वेतनात वाढ करावी. भोसरी रूग्णालयाच्या खासगीकरणानंतरचे फायदे व तोटे सभागृहाला सांगावेत.