Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Pune › विद्यापीठाची ‘हरित वारी निर्मल दिंडी’ मार्गस्थ

विद्यापीठाची ‘हरित वारी निर्मल दिंडी’ मार्गस्थ

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी 

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासोबत जाणार्‍या लाखो वारकर्‍यांना पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक बंदी आणि थर्माकोलबाबत जनजागृतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाद्वारे आयोजित हरित वारी निर्मल दिंडी रविवारी (दि. 8 जुलै) मार्गस्थ झाली. विद्यार्थी विकास मंडळाचा स्वच्छ व स्वस्थ वारी हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांनी याला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आवाहन केले. विद्यापीठाच्या हरित वारी निर्मल दिंडीची सुरूवात खासदार अनिल शिरोळे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. विलास उगले, प्रसेनजित फडणवीस, संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त शिवाजीराव मोरे यांच्या उपस्थित झाली. 

यावेळी डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, हरित दिंडीसोबत जाणारे महाविद्यालयातील विद्यार्थी स्वच्छतेचे काम करणार आहेत. पानाच्या पत्रावळ्यांचे वाटप, त्या उचलून त्यांचे कंपोस्ट, वारकर्‍यांनी शौचालयाचा वापर करणे यासाठी जनजागृती अशी कामे करण्यात येणार आहेत. विद्यापीठाद्वारे यावर्षी वारीमार्गावर व्यापक नियोजन करण्यात आले असून राष्ट्रीय दिंडीत 250, तर पालखी मुक्कामात वारकर्‍यांचे आरोग्य दूत म्हणून सुमारे 12 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या पर्यावरण संवर्धन राष्ट्रीय विद्यार्थी दिंडीद्वारे यंदा प्रथमच वारीमार्ग व परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण व संशोधन करण्यात येणार आहे. तसेच निर्मल वारी अभियान, सेंद्रिय खताची निर्मिती व शेतकर्‍यांना मोफत वितरण, विज्ञानदिंडी, स्वच्छ भारतअंतर्गत भारत समर इंटर्नशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी खासदार अनिल शिरोळे, डॉ. संजय चाकणे, राजेश पांडे, डॉ. अतुल साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी आणि डॉ. शिवाजी पाचारणे यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. प्रताप फलफले यांनी केले. त्यानंतर पालखी विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहापासून विद्यापीठ गेटपर्यंत आणण्यात आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत जनजागृती केली.