Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Pune › पीएमपीएमएलच्या धडकेत ज्येष्ठाला गमवावे लागले पाय

पीएमपीएमएलच्या धडकेत ज्येष्ठाला गमवावे लागले पाय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे / हडपसर प्रतिनिधी 

वळण घेताना पीएमपीएल बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलच्या बसथांब्याच्या प्लॅट फॉर्मजवळ उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक जखमी झाला असून त्याला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. तर एक महिला व तरुणी जखमी झाली.  ही घटना रविवारी दुपारी हडपसर येथील गाडीतळ पीएमपी बसस्थानकासमोर घडली. दुर्घटनेनंतर बसचालक पळून गेला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. परंतु पोलिस तात्काळ घटनास्थळी आल्याने अनुचित प्रकार टळला. 

ईश्वरलाल दगडूलाल राठोड (वय 70, हडपसर ) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जखमी झालेले जेष्ठ नागरिक राठोड हे दुपारी बसस्थानकाशेजारील पेपर स्टॉलवर पेपर घेऊन घरी जात होते. त्यावेळी कात्रजला जाणारी बस स्थानकातून बाहेर पडली. त्यावेळी वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि राठोड यांना धडक बसली.   ही बस सिग्नलला जाऊन धडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसचालक रेवनाप्पा बिराजदार हा अपघात होताच पळून गेला.  यानंतर नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र तात्काळ पोलिस  घटनास्थळी दाखल झाल्याने अनुचित प्रकार घडला नाही. 

अपघातात राठोड यांच्या दोन्ही पायांवरून पीएमपीएल बस गेली. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच एक महिला व तरुणी जखमी झाली. मात्र अपघातानंतर ती लागलीच निघून गेली.  बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला असल्याची माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले. 

ईश्वरलाल दगडूलाल राठोड हे खडकी अँमिनेशन फँक्टरी येथून सेवानिवृत्त होते. सत्तरवर्षीय राठोड यांच्या पेन्शनवर कुंटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.  नेहमीप्रमाणे गाडीतळ येथून फिरुन येतो, असे सांगून घरातून निघाले. परंतु बस वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना दोन्ही पायी गमवावे लागले. राठोड यांना एक मुलगा, एक मुलगी  आहे. त्यातच अपंग असलेला मुलगा वडिलाचे संगोपन करीत होता. त्यातच वडिलांनाही अपंगत्व आल्याने कुटुंबाला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.