पुणे : निमिष गोखले
दररोज सुमारे 70 लाख प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सुरक्षितपणे घेऊन जाणार्या एस.टी. महामंडळाची राज्यभर स्वतःची 609 एस.टी.स्थानके आहेत. त्यापैकी 568 एस.टी.स्थानके सध्या वापरात आहेत. गेली कित्येक वर्षेे या एस.टी.स्थानकांची दुरवस्था झाली आहे.एस.टी.स्थानकांची नियमित रंगरंगोटी नाही, डागडुजी नाही, दुरुस्ती नाही. त्यामुळे बसस्थानकांना बकाल स्वरूप प्राप्त झाले असून, नाक मुरडतच प्रवासी प्रवास करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर एस.टी.ची सर्व बसस्थानके व परिसर आता ‘कात’ टाकणार असून, त्यांचे रुपडे पूर्णतः पालटणार आहे.
पुण्याच्या स्वारगेट, शिवाजीनगरसह सासवड, राजगुरूनगर, सातारा, जेजुरी, म्हसवड, पुसेगाव आदी स्थानके अधिक स्मार्ट होणार असून, कोल्हापूर बसस्थानकाचे काम बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर होणार आहे. तसेच सांगलीचे माधवनगर बसस्थानक अधिक मोठे व प्रशस्त होणार आहे. एस.टी. महामंडळाने या बसस्थानकांच्या दुरुस्ती, नूतनीकरण, दर्जावाढीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील 79 बसस्थानकांच्या कामास सुरुवात झाली असून, त्यासाठी सुमारे 125 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याबरोबरच एस.टी.च्या स्वतःच्या मालकीच्या जागांची अवैध अतिक्रमणापासून सुटका व्हावी, या दृष्टीने 113 ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे कामदेखील सुरू झाले आहे. सन 2018-19 च्या अर्थसंकल्पासाठी नव्याने प्रस्तावात 29 बसस्थानकांचे नूतनीकरण व पुनर्बांधणीला शासनाने मंजुरी दिली असून, भविष्यात सुमारे 40 कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत.
सर्व बसस्थानके एकाच विशिष्ट रंगसंगतीमध्ये रंगविण्याची संकल्पना प्रशासनाने मांडली असून, त्यातून 305 बसस्थानकांचे एकसमान रंगसंगतीमध्ये रंग देण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या दिवाळीपर्यंत राज्यातील बहुतांश बसस्थानके नववधूसारखी सजलेली दिसतील. याबरोबर बसस्थानकावरील स्वच्छतागृहांबाबत वारंवार तक्रारी येत असतात. अस्वच्छ व अपुरी प्रसाधनगृहे महामंडळाची प्रतिमा मलीन करत आहेत. सीएसआर फंडातून नवी प्रसाधनगृहे बांधण्यात येणार असून, भारत पेट्रोलियम या कंपनीने यंदाच्या वर्षासाठी तब्बल पाच कोटी रुपये इतका निधी दिला आहे. त्यातून राज्यातील 22 स्थानकांतील स्वच्छतागृहे नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.