होमपेज › Pune › एसटी प्रशासनाला जाग

एसटी प्रशासनाला जाग

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 12:12AM

बुकमार्क करा
पुणे : निमिष गोखले 

पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवून चालक संतोष माने याने 9 जणांचा जीव घेतला होता. तसेच 30 जणांना जखमी केले होते. मानेची मानसिक स्थिती त्यावेळी बरी नव्हती, असे उघड झाले होते. त्यानंतर आता तब्बल सहा वर्षांनी एसटी प्रशासनाला जाग आली असून तशाच प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने चालकांसाठी समुपदेशक (काउन्सिलर) नेमण्याचे ठरवले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे, असे समजते. 

चालक हा एसटीचा कणा असून त्याच्यावर बस चालविताना प्रचंड मानसिक ताण असतो. यामुळे त्याची परिणिती गंभीर अपघातांमध्ये होऊ शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकांचे समुपदेशन करण्यासाठी 3-4 आगारांकरिता एक समुपदेशक याप्रमाणे मानद तत्त्वावर समूुपदेशक नेमणुकीबाबत परिपत्रक काढून सूचना देण्यात आल्या आहेत. योग्य उमेदवारांनी संबंधित विभागाकडे 17 जानेवारीपर्यंत अर्ज करायचा आहे, अशी माहिती देण्यात आली. एसटी चालकांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे, आदी कर्तव्ये समुपदेशकाला बजवावी लागणार आहेत.

त्याचबरोबर समुपदेशकांनी एसटी आगारात महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे बंधनकारक असेल, अशीही माहिती देण्यात आली.  दरम्यान, कोणत्या चालकांना समुपदेशनासाठी पाठवायचे आहे, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आगार पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. प्रवाशांशी वागताना सौजन्याचा अभाव, व्यसनाधिनता, गैरहजेरीचे अधिक प्रमाण, प्रापंचिक अडीअडचणीने मानसिक तणावाखाली वावर, लहान-सहान गोष्टींमध्ये चिडखोरपणा, भांडखोरपणा व विध्वंसक प्रवृत्ती, व्यवस्थापनाच्या प्रत्येक निर्णयाकडे संशयाने पाहणे, आदी बाबी आढळल्यास चालकाला समुपदेशनासाठी पाठविण्यात येणार आहे.

घरगुती ताणतणाव, वाहतूक कोंडीतून एसटी चालवताना, आगारात बस आत शिरताना व बाहेर पडताना, अपुरी झोप, जेवणाची आबाळ, अशा विविध कारणांमुळे चालकांना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, आदी आजार जडतात. त्यांना योग्य तो सल्ला व मार्गदर्शन देण्यास समुपदेशकांची मदत होणार असून यापुढील काळात एसटी चालकांवरील ताण-तणाव कमी होण्यास निश्‍चितच मदत होणार आहे.