Thu, Apr 25, 2019 13:34होमपेज › Pune › ‘लोकसेवा’ विलीनीकरणाचा ‘टीजेएसबी’चा  प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळला

‘लोकसेवा’ विलीनीकरणाचा ‘टीजेएसबी’चा  प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळला

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी

अवसायनात निघालेल्या लोकसेवा सहकारी बँकेच्या विलीनीकरणासाठी दि ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) दिलेला प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेटाळला आहे. ही माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी रात्री पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना दिली. रुपी को-ऑप. बँकेला गतवर्षीच्या आर्थिक वर्षात नफा झालेला असला तरी विलीनीकरणाबाबत फारशी प्रगती झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, याबाबत लोकसेवा बँकेचे अवसायक आणि जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) बी. टी. लावंड यांच्याशी संपर्क साधला असता, ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, ठेव विमा महामंडळाकडून आलेल्या सूचनांनुसार एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांची यादी आणि रक्कम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एक लाख रुपयांच्या आतील एकूण 7 हजार 500 ठेवीदारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांची रक्कम 16 कोटी 82 लाख रुपये परत देण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी (दि.25) महामंडळास सादर करण्यात आला आहे.

त्यास मान्यता मिळाल्यानंतर वाटपाची कार्यवाही केली जाईल.लोकसेवा बँकेच्या एकूण 9 हजार 97 ठेवीदारांचे 180 कोटी रुपये देणे आहेत. त्यातील साडेसात हजार ठेवीदारांचे 16.82 कोटी रुपये असून, उर्वरित 1 हजार 597 ठेवीदारांचे 163.18 कोटी रुपये देणे आहे. त्यापैकी 88 पतसंस्थांच्या 120 कोटी रुपयांचा समावेश असल्याचे सांगून ते म्हणाले की, एक लाखाच्या आतील ठेवीदारांना रक्कम देण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी सहकार आयुक्तांची मान्यता घेऊन उर्वरित ठेवींची रक्कम परत देण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल.  

बँकेच्या 339 कर्जदारांकडून अद्यापही 60 कोटी रुपयांचे कर्ज व त्यावरील 35 कोटी व्याज मिळून एकूण 95 कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे. कर्जातील 30 कोटी रक्कम ही तारण कर्ज आहे. तत्कालीन संचालक मंडळाकडून विनातारण 30 कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले असून, त्याच्या वसुलीसाठी  युद्ध पातळीवर काम सुरू आहे.