Mon, Apr 22, 2019 03:52होमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेशाचे मोबाईल ‘अ‍ॅप’ दोन दिवसांमध्ये होणार सुरू

‘आरटीई’ प्रवेशाचे मोबाईल ‘अ‍ॅप’ दोन दिवसांमध्ये होणार सुरू

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास शनिवार दि. 10 पासून सुरुवात झाली खरी; परंतु काही तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्यास पालकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात प्राथमिकचे उपसंचालक शरद गोसावी यांनी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये आरटीई प्रवेशासाठीचे मोबाईल ‘अ‍ॅप’ सुरू करणार असल्याची माहिती दिली.

बोगस आरटीई प्रवेशाला आळा बसावा यासाठी आरटीई प्रवेशाचा अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्याचा ऑनलाइन तसेच ऑफलाइन नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कारण हा दाखला महाऑनलाईनमार्फत आधारलिंक करण्यात येत आहे; परंतु आरटीई प्रवेशासाठी सुरू करण्यात येणार्‍या मोबाईल ‘अ‍ॅप’मध्ये तांत्रिक कारणास्तव उत्पन्नाचा दाखला आधार लिंक करत असताना अडचणी निर्माण होत आहेत; त्यामुळे मोबाईल ‘अ‍ॅप’मधील तांत्रिक अडचणी सोडविण्यास होणारा विलंब पाहता अगोदर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी व नंतर मोबाईल अ‍ॅप सुरू करण्याचे ठरविण्यात आल्याचेदेखील गोसावी यांनी सांगितले.

दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरताना अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये विधवांच्या पाल्यांसाठी उत्पन्नाचा दाखला वडिलांचा मागितला आहे. अर्जामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचा क्रमांक नमूद करण्याचा पर्यायच दिसत नाही. एससी प्रवर्गाचादेखील पर्याय दिसत नाही. तसेच अर्ज भरल्यानंतर तो सबमिट होत नसल्याची पालकांची तक्रार आहे. अशा प्रकारच्या जाचक अटी, तसेच त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना केली आहे. साधारण 28 फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.