Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Pune › बेशिस्त वाहनचालकांमुळे पोलिस खाते कोट्यधीश

बेशिस्त वाहनचालकांमुळे पोलिस खाते कोट्यधीश

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:22AM पुणे : नवनाथ शिंदे

राज्यात सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणार्‍या बेशिस्त चालकांची संख्या वाढतच आहे.  ही वाढती संख्या वाहतूक पोलिस विभागाच्या पथ्यावर पडत असून यातून दिवसागणिक पोलिस विभागाची मिळकत वाढत आहे. यामुळे अवघ्या पाच महिन्यांत वाहतूक पोलिस विभाग कोट्यधीश बनला आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उद्योग, व्यापार, शिक्षण, व्यवसाय करण्यासाठी स्थिरावलेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. दरम्यान दोन्ही शहराच्या विविध भागात अल्पावधीत पोहचण्यासाठी वाहन चालकांकडून झेब्रा क्रॉसिंग करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, सिग्नल तोडणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करणे, वाहन परवाना न बाळगणे, वाहनांना फॅन्सी क्रमांक लावणे असे सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जात आहेत.  

बेशिस्तांवर  कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने चलन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई केली आहे. त्यामध्ये जानेवारी ते मे 2018 अखेर अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत  28 वाहतूक विभागातंर्गत तब्बल 6 लाख 36 हजार 378 बेशिस्त वाहनचालकांचे चलान फाडण्यात आले आहे. विशेषतः चलानच्या माध्यमातून 4 लाख 58 हजार 527 जणांकडून 8 कोटी 20 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून 1 लाख 77 हजार 851 बेशिस्तांकडून 47 लाखांचा दंड वसूल केला आहे.  अवघ्या पाच महिन्यांत महसूलाची रक्कम 8 कोटी 67 लाखांपर्यंत पोहचली आहे.  या रक्कमेतून वाहतूक विभाग कोट्यधीश होत आहे. 

वाहतूक विभागाच्या या धडाकेबाज कारवाईने  वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मात्र, महाविद्यालयीन तरुण-तरूणी दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि खासगी वाहनचालकांकडून बेशिस्त वाहतूक केली जात असल्यामुळे इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक नियमभंगाचा संदेश थेट मोबाईलवर

शहरातील अनेक दुचाकी चालकांकडून चौकात जर वाहतूक विभागाचे कर्मचारी हजर नसल्यास झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबचिणे, वाहनांना फॅन्सी नंबर लावणे, सिग्नल तोडून प्रवास केला जातो. अशा वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून क्रमांक शोधून त्यांच्या मोबाईलवर वाहतूक नियमभंग केल्याचा संदेशासह दंडाचे तडजोड शुल्क पाठविले जाते. पाच महिन्यात 77 हजार 123 जणांच्या मोबाईलवर वाहतुकीचा नियमभंग केल्याप्रकरणी संदेश पाठविण्यात आले आहेत.