Mon, May 20, 2019 08:29होमपेज › Pune › वैष्णवांचा मेळा, संगे नाचे विठू सावळा

वैष्णवांचा मेळा, संगे नाचे विठू सावळा

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:05AMविष्णूमय जग वैष्णवांचा धर्म 
भेदाभेद भ्रम अमंगळ 
आईका जी तुम्ही भक्त भागवत 
कराल ते हित सत्य करा 
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर 
वर्म सर्वेश्‍वर पूजनांचे 
तुका म्हणे एका देहांचे अवयव 
सुख दुःख जीव भोग पावे

पुणे : प्रतिनिधी

डोईवर तुळशी वृंदावन..., हाती टाळ त्यास मृदंगाची साथ..., मुखी अखंड हरिनामाचा जयघोष करीत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या संगे..., संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यनगरीत आगमन झाले. यंदा वारीनिमित्ताने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज माउलींच्या पालखी मार्गावर स्वच्छ वारी-सुंदर वारीचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून दिला.

संत ज्ञानेश्‍वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्‍कामास असून, पुढील मार्गाकडे प्रस्थान असणार आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले. दहीभाताचा नैवेद्य दाखविल्यानंतर दोन्ही पालख्या मंदिराच्या सभामंडपात स्थानापन्न झाले. आरती, स्वागत, अभिषेक होऊन पालखीच्या दर्शनाकरिता दर्शनबार्‍या खुल्या करण्यात आल्या. पालखी विठोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

तत्पूर्वी वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने वारकर्‍यांना पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत होते. पालखी दर्शनाकरिता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

माउली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणार्‍या अश्‍वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते. फर्ग्युसन महाविद्यालय चौकात माउलींच्या पालखीची  महाआरती झाली. त्यानंतर टिळक चौक मार्गे पालखी मुक्‍कामाकडे रवाना झाली. रात्रीच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचली. आरती, स्वागत, अभिषेक झाल्यानंतर पालाखीच्या दर्शनबार्‍या सुरू झाल्या. पालखी आगमनादरम्यान संतांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी अवघा जनसागर लोटला होता. पुणे शहराला भक्तीच्या महासागराचेच स्वरूप प्राप्त झाले आहे.

भक्‍तीरसात चिंब जगद‍्गुरूंच्या पालखीचे शहरात आगमन

पाऊले चालती पंढरीची वाट.., या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला..., विठ्ठल विठ्ठल जयहरी.., देव विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.., माझे माहेर पंढरी..,  यांसारख्या अभंगांच्या ध्वनी, फडफडणार्‍या भगव्या पताका... कपाळी टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी विठ्ठल नामाचा गजर, रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या आणि ओसंडून वाहणारा अबालवृद्धांचा आनंद, आशा भक्‍तीमय वातावरणात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात शनिवारी जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. पुण्य हे नगर । जाहला भक्तीचा जागर । अवतरला महासागर । वैष्णवांचा ॥ या ओवीचा जणू साक्षात्कारच या वेळी पुणेकरांनी अनुभवला. 

जगद‍्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे सायंकाळी पाचच्या सुमारास वाकडेवाडी चौकात आगमन होताच उपस्थितांनी एकच हरिनामाचा जयघोष करत स्वागत केले. महापौर मुक्‍ता टिळक यांनी पालखीस पुष्पहार अर्पण केला. या वेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी आमदार विजय काळे,  नगरसेविका स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, शिल्पा  भोसले उपस्थित होते. पालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांचा आणि विणेकर्‍यांना श्रीफळ, बिया आणि महिलांना तुळस देऊन सन्मान केला. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या दिंड्या सकाळपासूनच पुण्यनगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. लाखोंच्या संख्येने भक्तगण तुकोबांच्या दर्शनासाठी डोळे लावून बसले होते. पालखी शहरात दाखल होताच पुणेकरांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रथातील तुकोबांची पालखी आणि पादुका डोळ्यांना दिसल्या आणि भाविक कृतकृत्य झाले. वारकर्‍यांचा हा भक्तीप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्त्यामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक मार्गे मुक्‍कामाच्या ठिकाणाकडे निघाला. 

निवडुंग्या विठ्ठल मंदिरात आरती ः

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्‍काम असलेल्या नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिर येथे पालखीचे आगमन रात्री नऊच्या सुमारास झाले. या वेळी निवडुंग्या विठ्ठल मंदिराचे विश्‍वस्त के. के. बाबर, अ‍ॅड. अरुण स्वामी, चंद्रकांत मिठापेल्ली, रवींद्र पाध्ये यांच्या हस्ते पालखी रथाचे स्वागत करण्यात आले. या वेळी पाद्यपूजन करून पालखी मंदिरात ठेवण्यात आली. त्यानंतर आरती करून भाविकांना दर्शन रांग सुरू करण्यात आली.