Tue, Apr 23, 2019 06:39होमपेज › Pune › ‘पीएमपीएमल’चे ब्रेक पुन्हा निकामी

‘पीएमपीएमल’चे ब्रेक पुन्हा निकामी

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 12:19AM

बुकमार्क करा
पुणे/बिबवेवाडी : वार्ताहर

पीएमपीएमएमल बसच्या अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. बिबवेवाडी येथील डॉल्फिन चौकात राजीव गांधी बस डेपोमधून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने प्रवासी किंवा पादचारी जखमी झाला नाही; मात्र बसचालक किरकोळ जखमी झाला.  मागील महिन्यातच या बसस्थानकातून निघालेल्या एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील राजीव गांधी डेपोतून बाहेर निघाल्यानंतर तीव्र उतार आहे. चालक हनुमंत झालटे हे बस डेपोतून शिवाजीनगरकडे जाणारी बस (एम.एच 12 एफ सी 9476) दुपारी साडेतीन वाजता घेऊन निघाले. उताराच्या रस्त्यावर डॉल्फिन चौकामध्ये 3.51 वाजता बसचे ब्रेक निकामी झाले. तीव्र उतारामुळे झालटे यांना बसवर नियंत्रण मिळविणे कठिण होते. परंतु झालटे यांनी प्रसंगावधान दाखवत बस डॉल्फिन चौकाच्या कठड्यावर धडकवून थांबवली. बसमध्ये दोन प्रवासी होते, रस्त्यावर व चौकात गर्दी कमी असल्याने कोणीही जखमी झाले नाही. मात्र चालक जखमी झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सुदैवाने मोठा अपघात टळला. यावेळी झालेल्या आवाजामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ बस बाजूला घेऊन वाहतुक सुरळीत केली. 

प्रशासनाकडून डेपोतील समस्यांची पाहणी 

मार्केट व राजीवगांधी बस डेपोला महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी भेट देऊन डेपोतील समस्यांची पाहणी करावी अशी मागणी अपघाताच्या ठिकाणी प्रवाशी व स्थानिक नागरिकांत ऐकायला मिळाली. राजीव गांधी बस डेपोतील विविध समस्या व सततचे बसेसचे अपघात टाळण्यासाठी तत्काळ उपाय योजना कराव्या अशी मागणी पीएमपीएमएल प्रशासनाकडे करणार असल्याचे  नगरसेविका रुपाली धाडवे यांनी सांगितले. 

नोव्हेंबर महिन्यात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. तर  ब्रेक निकामी होऊन बिबवेवाडी परिसरातील सातवा अपघात आहे. तर आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अतिक्रमणाचा विषयही अनेक दिवस चर्चिला देखील गेला. महापौर मुक्ता टिळक यांनी येथील नगरसेवकासह येथील पाहणी दौरादेखील केला व येथील अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. मात्र येथील अतिक्रमणे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत.