Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Pune › ‘पीएमपी’ला संचलन तूट दरमहा मिळावी

‘पीएमपी’ला संचलन तूट दरमहा मिळावी

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:03PMपिंपरी : प्रतिनिधी

पीएमपीएलला दरवर्षी मोठी संचलन तुट येते.  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 टक्के हिस्सांचा 112 कोटी 6 लाखांपैकी दर महिन्यास 7 कोटी 50 लाख रूपयांचा निधी अदा करावा. सदर निधी वेळेवर न मिळाल्याने इंधन खरेदीअभावी बस संचलन करणे अवघड होऊन जाते. निधी दरमाह द्यावा, अशी विनंती पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना मुंडे यांनी पालिकेकडे केली.पीएमपीएलसंदर्भात नगरसेवकांना माहिती देण्याबाबतची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार पदाधिकारी व अधिकारी  उपस्थित होते.

गुंडे यांनी शहरातील पीएमपीविषयी सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, एकूण 302 मार्गावर दररोज बस धावत असून,  दररोज 3 लाख 70 हजार प्रवासी त्याचा लाभ घेतात. पिंपरी-चिंचवड शहरात धावणार्‍या 376 आणि पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्याकडे जाणार्‍या193 बस मार्ग आहेत. शहरातून एकूण 569बस संचलन होते. एक लाख लोकसंख्येसाठी 50 बस हव्यात. त्या प्रमाणात दरवर्षी 100 बस खरेदी होणे आवश्यक आहे. तसे, मागील कित्येक वर्षे न झाल्याने आता एकाच वेळी 1 हजार 233 बस खरेदी प्रक्रिया सुरू आहे. त्यात इलेक्ट्रीकच्या 500, तेजस्विनी 33, मिडी बस 200, नवीन 500 आहेत. सीएनजी पुरवठादाराचे बील नियमितपणे अदा न केल्यास ते पुरवठा बंद करतात. त्यामुळे अनेक बसेस रस्त्यावर धावू शकत नाहीत. त्यामुळे प्रवासांची गैरसोय होऊन पीएमपीचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी दरमहा संचलन तुट मिळणे अत्यावश्यक आहे, असा त्यांनी सांगितले.

प्राधिकरणात तीन जागी इलेक्ट्रानिक्स बस डेपो

इलेक्ट्रिकल बस डेपो व चार्जिंग स्टेशनसाठी पीएमपीने 3 जागांची मागणी केली आहे. भोसरी पोलिस ठाण्याजवळील 8 हजार 540 चौरस मीटर जागा, मोशी सेक्टर क्रमांक 5 व 8 येथील 6 हजार 300 चौरस मीटर व मोशी सेक्टर 11 येथील 15 हजार 800 चौरस मीटर आणि वाकड डेपोसाठी 10 हजार चौरस मीटर जागा पीएमपीएलने प्राधिकरणाकडे मागितली आहे. त्या संदर्भात प्राधिकरणाने जागा मोबदला मागितला असून, सदर जागेची मालकी त्यांच्याकडेच ठेवून त्यांनाच डेपो बांधून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे नयना गुंडे यांनी सांगितले. तसेच, निगडी, भोसरी, पिंपळे गुरव व हिंजवडी या चार स्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. 

पीएमपीएलला हव्यात आठ जागा

पीएमपीला पिंपरी-चिंचवड शहरातील 8 जागा डेपोसाठी हव्या आहेत. प्राधिकरण ताब्यातील रावेत सेक्टर 29 येतील 8 हजार चौरस मीटर जागा डेपोसाठी मागितली आहे. मोरवाडी बस स्थानक, थेरगाव बस स्थानकासाठी  8 हजार चौरस मीटर, महापालिका भवनासमोरील 7 हजार 300 चौरस मीटर, दापोडी सर्वे क्रमांक 1/4 मधील 29 हजार 600 चौरस मीटर जागा डेपो व पार्किंगसाठी, एमआयडीसी आकुडी, जीपी 32 येथील 10 हजार चौरस मीटर जागा डेपो व पार्किंगसाठी, चर्होली सर्वे क्रमांक 129,130 येथील 14 हजार चौरस मीटर जागा डेपो, स्थानक व पार्किंगासाठी, चिंचवड येथील आरक्षण क्रमांक 204 येथील 1 हजार चौरस मीटर जागा स्थापक व पार्किंगसाठी पीएमपीएलने मागितली आहे. त्यातील सात पैकी 3 जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात नाहीत.