Mon, May 20, 2019 08:25होमपेज › Pune › ‘पीएमपी’च्या मिडीबस ठरताहेत उपयुक्त

‘पीएमपी’च्या मिडीबस ठरताहेत उपयुक्त

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 11:26PMपिंपरी - नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी - चिंचवड  आणि  पुणे महापालिका यांच्या सहभागातून घेण्यात आलेल्या पीएमपीएमएलच्या  इंद्रधनुष्य मिडी बस प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहेत. सोमवारी  (दि. 28) आणखी 24 बसेस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होत आहेत.  त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली प्रवासी सुविधा उपलब्ध होणार आहे.

पीएमपीने  200  इंद्रधनुष्य मिडीबस खरेदी करण्याचा निर्णय घेतला.  यापैकी 120 बसेस पुणे महापालिकेच्या तर 80 बसेस पिंपरी-  चिंचवड महापालिकेच्या आर्थिक मदतीतून घेण्यात आल्या . 200 पैकी  163 बसेस आधीच दाखल झाल्या असून त्या मार्गावर धावत आहेत.  सोमवारी आाणखी 24 बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. उरलेल्या 13 बसेस पुढील महिन्यात येणार आहेत.  

पीएमपी कडील मोठ्या बसेसची आसनक्षमता 44 ,42 ,38 अशी वेगवेगळी आहे.   तर इंद्रधनुष्य मिडी बसची आसन क्षमता 32 आहे आयटीएमएस (इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम),आपोआप उघडझाप करणारे दरवाजे अन छोट्या रस्त्यांवरून सहज धावण्यासाठी उपयुक्तता यामुळे या बसेस प्रवाशांना आकर्षित करत आहेत.   पीएमपीने महिलांसाठी यातील 33 तेजस्विनी  बसेस सुरू केल्या असून यापैकी 10 बसेस कात्रज,  प्रत्येकी चार बसेस नरवीर तानाजी वाडी,  कोथरूड साठी ,तर प्रत्येकी तीन बसेस हडपसर, भेकराईनगर, निगडी, भोसरी डेपोला अन 2 बसेस स्वारगेट डेपोला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  

सध्या 200 पैकी 163 बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत.  24 उद्या दाखल होत आहेत उर्वरित 13 पुढच्या महिन्यात दाखल होत असून या सर्व बसेस मार्गावर आल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगली प्रवासी सुविधा मिळणार आहे. पिंपरी ते घरकुल, पिंपरी ते बोर्‍हाडेवाडी यासारख्या पिंपरी - चिंचवडमधील उपनगरे जोडणार्‍या मार्गावर धावत असलेल्या मिडी बसेस प्रवाशासाठी पर्वणी ठरल्या आहेत. 

नवनवीन मार्गावर बसेसची गरज

सध्या ज्या मार्गावर पीएमपीची बससेवा उपलब्ध आहे. त्याच मार्गावर या इंद्रधनुष्यमिडी बसेस सुरू करण्याऐवजी उपनगरे जोडणारे पिंपरी गाव ते पुणे मुंबई महामार्ग मार्गे प्राधिकरण, देहूगाव तसेच डुडुळगाव मार्गे आळदी ,भोसरी ते पिंपरी गाव मार्गे सांगवी ,विद्यापीठ ते पिंपरी असे मार्ग सुरू करून इंद्रधनुष्य बसेस या मार्गावर सोडाव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.