Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Pune › तिहेरी तलाक हा मानवाधिकाराचा विषय

तिहेरी तलाक हा मानवाधिकाराचा विषय

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 22 2018 11:34PMपुणे : प्रतिनिधी

तिहेरी तलाक या इस्लामिक परंपरेच्या विरोधात मुस्लिम महिला सशक्त लढा देत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तिहेरी तलाक परंपरेमुळे अनेक महिलांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. शायराबानो प्रकरणात तर सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकला अवैध घोषित केले होते. त्यानंतर आता तिहेरी तलाक हा फक्त महिलांचा विषय राहिला नसून तो मानवाधिकाराचा विषय बनला आहे, असे मत माजी खासदार आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून संस्थेच्या 48 व्या वर्धापनदिनानिमित्त समाजप्रबोधन पुरस्कार-कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या हस्ते डॉ. नूरजहाँ साफिया नियाज यांना समाजप्रबोधन पुरस्काराने तर अ‍ॅड. बालाजी श्रीनिवासन यांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, संस्थेचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी उपस्थित होते. याप्रसंगी मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले, ज्या देशात महिलांना सन्मान नाही तो देश पुढे जाऊ शकत नाही. तिहेरी तलाक परंपरा ही महिलांसाठी गुलामगिरी आहे. तिहेरी तलाक परंपरेमुळे मुस्लिम महिलांवर अन्याय होत आहे. तिहेरी तलाक परंपरा बंद करायची असेल तर राज्यसभेतील विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा.

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह म्हणाले, मी विचारवंत नसून मनोरंजन करणारा आहे. उपस्थित मान्यवरांप्रमाणे मला विचार मांडता येतीलच असे नाही, परंतु मी हमीद दलवाई यांच्या पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवतो. तसेच अभिनेत्याचे काम दुसर्‍यांचे विचार इतरांपर्यंत अभिनयाच्या माध्यमातून पोहचविणे आहे.

 

Tags : pune, pune news,  Muslim Satyashodhak Mandal, anniversary,