देहूरोड : वार्ताहर
देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपाजवळ मोठ्या नाल्यावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम रखडले आहे. दरम्यान, मागील दोन आठवड्यात या नाल्यात भरधाव दुचाकी पडण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास आणखी एका घटनेत दुचाकीसह एक तरुण सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात पडला. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला.
देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्याचे काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील काही पूल व मोर्यांचे काम अद्याप रेंगाळले आहे. शितलानगर चौकाजवळ पूलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ठेकेदाराने सर्व लक्ष त्या कामाकडे केंद्रीत केले आहे. त्यामुळे शिंदे पेट्रोलपंपाच्या अलिकडील मोठ्या नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या मोरीचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून हे काम बंदच आहे. दरम्यान, सेवा रस्त्याचा वापर करावा असे फलक संबंधितांकडून रस्त्यावर लावण्यात आले असल्यामुळे भरधाव वाहने येथून नेताना वाहनचालकांना या खड्डयाचा अंदाज येत नाही; परिणामी वाहनचालक या नाल्यात पडतात.
दहा-बारा दिवसांपुर्वी (दि. 29) रात्री दोन दुचाकी या खड्डयात पडल्या. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. तर दुसर्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास एक दुचाकी या खड्डयातील नाल्यात पडली. सुदैवाने या दुचाकीचा चालक बचावला. घटनेला आठवडा उलटत असतानाख सोमवारी रात्री आणखी एक दुचाकीस्वार तरूण दुचाकीसह या नाल्यात पडला. हा प्रकार पाहणार्या काही महिलांनी आरडाओरड करून मदत मागितल्यामुळे त्याला तातडीने वाचविण्यात आले.
सेवा रस्त्यावरील ही मोरी सुमारे दहा फूट खोल असून त्यातून संपूर्ण देहूरोड शहराचे सांडपाणी वाहुन नेणारा मोठा नाला वाहतो. राडारोडा आणि गाळाचे साम्राज्य असलेला हा नाला सुमारे तीन-चार फूट खोल आहे. त्यामुळे या नाल्यात पडलेला व्यक्ती एखाद्याच्या नजरेस न पडल्यास किंवा वेळीच मदत न मिळाल्यास गाळात रुतून जीवावर बेतण्याची शक्यता आहे. दरम्यान सेवा रस्त्याचे काम करणार्या ठेकेदार कंपनीशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. संबंधित तरूणाने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याने पोलीस दप्तरी या प्रकाराची नोंद नाही.