होमपेज › Pune › रेरा नोंदणीविनाच प्राधिकरणाचे गृहप्रकल्प

रेरा नोंदणीविनाच प्राधिकरणाचे गृहप्रकल्प

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:46AMपिंपरी : प्रतिनिधी

नागरिकांच्या हितासाठी तयार करण्यात आलेल्या रेरा कायद्यानुसार प्राधिकरणाने नोंदणी केलेली नाही. गृहप्रकल्प सुरू होण्यापुर्वीच कोणत्या कंपनीचे आणि ब्रँडचे साहित्य गृहप्रकल्पांना वापरण्यात येणार आहे याबाबत संकेतस्थळावर माहिती देणे गरजेचे आहे. प्राधिकरणाचा एकही प्रकल्प आठ सदनिकांपेक्षा कमी संख्येचा नाही. सर्व प्रकल्प शंभर सदनिकांपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने रेराअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्षच केले आहे.

राज्य शासनाच्या गृहनिर्माण मंत्रालयाने कोणत्याही गृहबांधणी संस्थेने किंवा खासगी बांधकाम व्यावसायिकांनी गृहयोजना सुरू करण्याआधी रेरा कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करण्याची सक्‍ती केली आहे. पाचशे चौरस मीटर किंवा आठ सदनिकांपर्यंतच्या प्रकल्पांना रेरामधून सुट देण्यात आली आहे. 

गृहप्रकल्प नोंदणीची आणि त्या  नोंदणीची सर्व माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेरा अंतर्गत नोंदणी झाल्यानंतर विकसक किंवा गृहनिर्माण संस्थांनी रेरामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसारच सदनिकांची बांधणी करणे सक्‍तीचे आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विविध पेठांमध्ये गृहनिर्माण योजनांची कामे हाती घेतली आहे; मात्र गृहनिर्माण संस्था किंवा बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असलेली महारेराकडील (स्थावर संपदा) (विनिमय व विकास) (कायदा) नोंदणी प्राधिकरणाने न केल्यानेच राज्य सरकारच्या निर्णयालाच हरताळ फासल्याचे दिसत आहे.प्राधिकरणाने बर्‍याच वर्षानंतर गृहयोजनांची कामे हाती घेतल्यामुळे शहरातील नागरिकांनी प्राधिकरणाचे कौतुक केले आहे; मात्र नियमाला हरताळ फासुन प्राधिकरणाने गृहयोजनांची कामे हाती घेतल्याचे चित्र समोर आले आहे.