Mon, Nov 19, 2018 21:03होमपेज › Pune › निगडीतील अभियंत्याकडे ७ पिस्तूल, १५ काडतुसे

निगडीतील अभियंत्याकडे ७ पिस्तूल, १५ काडतुसे

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:36AMपिंपरी : प्रतिनिधी 

निगडीतील ओटास्किम परिसरात छापा मारून अटक केलेला आरोपी चक्क यांत्रिकी अभियंता असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे 7 पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. 

अनुप नवनाथ सोनवणे (28,रा. ओटास्किम, निगडी) या यांत्रिकी अभियंत्यांसह त्याचा मित्र अवधूत जालिंदर गाढवे (26, रा. मोशी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 

अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकोडी यांना निगडी येथील ओटास्किम परिसरात एका तरुणाने विक्रीसाठी 4 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे आणल्याची खबर मिळाली. त्यावरून नायकोडी यांनी शनिवारी (दि.25) सोनवणेच्या घरावर छापा मारला. 

यावेळी त्याने घरात लपवून ठेवलेली 4 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत केली. पुढील तपासात सोनवणे याने आणखी 3 पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यातील 2 पिस्तुल त्याचा मित्र गाढवेला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी गाढवेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तुल हस्तगत केली.