होमपेज › Pune › अकरावी प्रवेशाची माहितीपुस्तिका आजपासून मिळणार

अकरावी प्रवेशाची माहितीपुस्तिका आजपासून मिळणार

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी 

दहावीचा निकाल लागायला अजून उशीर असला तरी विद्यार्थ्यांना  अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणार्‍या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लागणार्‍या माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत सोमवार, दि. 23 रोजीपासून मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती माध्यमिकच्या उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

समितीतर्फे 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेश प्रकिया कशी राबवावी, यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात एक बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत राऊत यांनी प्रवेश प्रक्रियेशी निगडित असणारे मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिकारी आदींना मार्गदर्शन केले. राऊत यांनी प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शन पुस्तिका विद्यार्थ्यांना वितरित करणे, मुख्याध्यापकांनी दिलेल्या भूमिका कशा बजवाव्या, प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर कोणाची महत्त्वाची भूमिका आहे, प्राचार्याने प्रवेशाबाबत काय कार्यवाही करावी अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. येत्या सोमवारी, 23 एप्रिलपासून शाळांच्या प्रशासनाला माहिती पुस्तिका झोन केंद्रावरून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे घेऊन जायच्या आहेत. त्यानंतर शाळांनी त्या 23 ते 27 एप्रिल दरम्यान वितरित करायच्या आहेत.

शाळांनी माहिती पुस्तिका या त्यांच्या झोन केंद्रावरून सोमवारी घेवून जायच्या आहेत. त्यानंतर शाळेने पुस्तिकांचे वितरण करण्याबाबत नियोजन करून त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरीत करायच्या आहेत. विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका 150 रुपयांना मिळणार आहे. माहिती पुस्तिका मराठी आणि इंग्रजी, अशा दोन्ही भाषेत राहणार आहे. त्यामध्ये महाविद्यालयांची संक्षिप्त माहिती आणि ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी लॉगिन आयडी राहणार आहे. याचा वापर करुन विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे.