Thu, Jun 27, 2019 18:32होमपेज › Pune › ई ‘पॉस’ मशिन शासनाने परत मागविले

ई ‘पॉस’ मशिन शासनाने परत मागविले

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 08 2017 11:23PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

चार महिन्यांपुर्वी अन्नधान्य वितरणाकरिता रेशनिंग दुकानदारांना दिलेल्या 201 ई-पॉस मशिन अन्‍नधान्य पुरवठा विभागाने परत घेतल्या आहेत. सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी या मशिन परत मागविण्यात आल्या आहेत; तसेच डिसेंबर महिन्याच्या वाटपाचे धान्य दुकानदारांना अद्यापही पोच न झाल्याने धान्य वितरण ठप्प झाले आहे. 

गेली चार महिन्यांपासून ई-पॉस मशिनच्या माध्यमातून कार्डधारकांना रेशनिंग वितरित केले जात आहे. याकरिता शहरात 201 मशिनचे वाटप करण्यात आले आहे; मात्र सध्या या मशिनचे सॉफ्टवेअर अपग्रेड करायचे असल्याचे कारण सांगत या सर्व मशिन परत घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुढील महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत दुकानदारांना धान्य उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी अन्‍न व नागरी पुरवठा विभागाची आहे;

तसेच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 7 तारखेदरम्यान धान्य वाटप करत, अन्‍नदिन साजरा करण्याचे सरकारचे निर्देश आहेत; मात्र 7 डिसेंबर जाऊनही या विभागाकडून डिसेंबर महिन्याच्या धान्याचा साठा दुकानदारांना मिळालेला नाही. हा साठा उपलब्ध झाला असता, तरीदेखील ई-पॉस मशिन उपलब्ध नसल्याने धान्य वितरित करण्याचे मोठे आव्हान दुकानदारांसमोर असते. 

अपग्रेडेशनासाठी दुकानदारांच्या ई-पॉस मशिन या विभागाकडे जमा केल्या आहेत. यामुळे धान्य वाटप ठप्प झाले आहे. अन्‍न व नागरी पुरवठा विभागाकडून या महिन्याचा अन्‍नधान्य साठा उपलब्ध दिला नाही. या बाबत शिधापत्रिका कार्यालयाचे परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.