Fri, Jul 19, 2019 20:53होमपेज › Pune › दख्खनची राणी होणार २४ कोचची

दख्खनची राणी होणार २४ कोचची

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:20AMपुणे : निमिष गोखले

पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रतिष्ठित दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस लवकरच 24 कोचची करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे अधिक प्रवाशांना त्यातून प्रवास करता येणार असून त्याचे आरक्षण न मिळाल्याने नाराज होण्याची वेळ प्रवाशांवर येणार नाही. सद्यस्थितीत डेक्कन क्वीनला 17 कोच असून 4 एसी चेअर कार, 1 डायनिंग कार, 10 सेकंड क्‍लास व 2 पासहोल्डर्स कम ब्रेक व्हॅनचा यात समावेश आहे. डेक्कन क्वीनने दररोज सुमारे दीड हजार प्रवासी प्रवास करत असून 24 कोचची झाल्यानंतर तीन हजार प्रवासी त्यातून सहज प्रवास करू शकतात. 

पुण्याहून मुंबईला  सिंहगड, प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या थेट जातात. परंत डेक्कन क्वीनलाच पहिली पसंती प्रवाशांकडून देण्यात येते. अनेकदा आठवडाभर आधी आरक्षण करून देखील प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याने त्यांचे  नाव प्रतीक्षा यादीत येते. डेक्कन क्वीनचा एक वेगळा चाहता वर्ग असून पुण्याहून मुंबईला केवळ सव्वा तीन तासांत पोहोचणारी एकमेव रेल्वे असल्याने प्रवासी तिलाच प्राधान्य देतात.

डेक्कन क्वीन सकाळी सव्वा सात वाजता पुण्यातून निघून मुंबई सीएसएमटी येथे 10.25 वाजता पोहोचते. या गाडीचा वेग ताशी सरासरी 60 किलोमीटर आहे.  दरम्यान, गाडीच्या कोचची संख्या वाढविल्यानंतर तिच्या वेगावर परिणाम कमी होईल, अशी भिती रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, डेक्कन क्वीन 24 कोचची करण्यात येणार असल्याचा निर्णय स्तुत्य असून तिकीट न मिळाल्याने ‘एक्स्प्रेस हाय-वे’वरून महागडा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येणार नाही. मात्र भविष्याची तरतूद म्हणून आताच डेक्कन क्वीनला 30 कोचची करावी, तसेच पुणे स्टेशनसह पुणे विभागातील सर्व प्लॅटफॉर्म 30 कोचच्या गाड्या मावतील, असे प्रशस्त करण्यात यावे.

राणी होणार पारदर्शक

दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन पारदर्शक होणार असून तिला काचेचे कोच बसविण्यात येतील. यामुळे खंडाळा घाटातून गाडी जाताना प्रवाशांना नयनरम्य निसर्गसृष्टी अनुभवायला मिळेल. याशिवाय मोफत वायफाय, आकर्षक आसन व्यवस्था, संगीत ऐकण्यासाठी खास सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत तिचे रुपडे पालटणार असून डेक्कन क्वीन 24 कोचची व्हायला वर्ष-दीड वर्ष तरी लागेल, अशी माहिती देण्यात आली.

डेक्कन क्वीन 24 कोचची करण्यात येणार असल्याचे नियोजन आहे. मात्र, पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 4,5 आणि 6 लहान असून 24 कोचच्या गाड्यांना ते पुरणार नाहीत. सध्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम प्रगतिपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतरच डेक्कन क्वीनच्या कोचची संख्या वाढू शकेल. अनेकांना डेक्कन क्वीनमधूनच प्रवास करायचा असतो. मात्र, कोचची संख्या 17 असल्याने त्यांना आरक्षण देऊ शकत नाही. आता हा प्रश्‍न निकाली निघणार आहे.   -मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक