Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Pune › लांडे यांचा आयुक्तांवर हल्लाबोल

लांडे यांचा आयुक्तांवर हल्लाबोल

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:13PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीने चिंचवड मतदार संघात नवीन बांधकामांना पाणीबंदी केली ठीक पण, महापालिका आयुक्त गोट्या खेळतात का? असा सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी येथे केला. राज्य सरकारच्या शास्तीकर माफीच्या निर्णयानुसार केवळ 600 स्क्वेअर फूटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ होणार असून त्यापुढील घरांचे काय? या निर्णयाचा अद्याप ‘जीआर’ देखील आला नाही. त्यामुळे हा निर्णय शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम कोणाच्या, कोणत्या नातेवाईकाला द्यायचे याबाबत निर्णय झाला नसल्यामुळेच स्थायी समिती सभा तहकूब केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी (दि. 13)  झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार लांडे बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, फजल शेख, निलेश पांढारकर उपस्थित होते.लांडे म्हणाले की, अण्णासाहेब मगरांपासून ते अजित पवार यांच्यापर्यंत सर्वांनी शहराच्या नियोजनपूर्वक विकासासाठी प्रयत्न केलेे. त्यामुळेच शहराची देशभरात ओळख आहे. परंतु, आता  शहराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालला आहे. कायदा-सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिला, मुली असुरक्षित आहेत. केवळ चांगले काम सुरु असल्याचे भासविले जात असून असाच कारभार सुरु राहिला तर शहराचे भविष्य चांगले नाही. भाजपने आजपर्यंत शहरासाठी एकही चांगला निर्णय घेतला नाही. केवळ राष्ट्रवादीच्या काळातील कामांवर बाता मारण्याचे काम चालू आहे.

चिंचवड मतदार संघात बांधकाम बंदीच्या निर्णयाबाबत विचारले असता लांडे म्हणाले, सध्या स्थायी समितीमध्ये कोणतेही ठराव केले जात आहे. कोणीही उठेल आणि काही निर्णय घेईल. परंतु, ठरावाची अमंलबजावणी करायची की नाही हे आयुक्तांनी ठरवायचे आहे.  स्थायीत पाणीबंदीचा ठराव झाला ठीक, पण आयुक्त काय गोट्या खेळत होते का ? असा सवाल माजी आमदार लांडे यांनी केला. आयुक्त योग्य निर्णय घेतील असे ते म्हणाले.शहरात अतिक्रमण वाढले आहे. आयुक्त सक्षम नसल्याने शहराची दुरावस्था झाली आहे. डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकार्‍यांची शहराला गरज आहे. असे लांडे म्हणाले. भोसरीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत विचारले असता भोसरीत गुन्हेगारी कधी नव्हती. पोलिसांची आकडेवारी बघा. भोसरीत नेहमीच गुन्हेगारी आहे, असे ते म्हणाले.

खा. आढळराव बोलले का ?

पाणी बंदीबाबत राष्ट्रवादी शांत राहिल्याबद्दल विचारले असता लांडे म्हणाले की, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालिका सभागृहात राष्ट्रवादीची भूमिका मांडली आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी पाणीबंदी विरोधात भूमिका मांडली पण खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कुठे काय बोलले असा मिस्कील सवाल लांडे यांनी केला.

त्यांनी समतोल राखला

विधानपरिषद निवडणुकीत डावलले गेल्याबद्दल विचारले असता, विरोधकांपैकी एक नाव शहरात चर्चेत होते त्यांना संधी न दिल्याने आमच्या नेतृत्वानेही समतोल ठेवला पण मी नाराज नाही असे ते म्हणाले. विधानसभा लढणार की लोकसभा या प्रश्नावर आपण सांगाल ती लढवू असे उत्तर देत त्यांनी उत्सुकता कायम ठेवली.