Wed, Apr 24, 2019 15:41होमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांनी लायकी ओळखून टीका करावी

मुख्यमंत्र्यांनी लायकी ओळखून टीका करावी

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा तोतर्‍या भाषेत ‘शुभंम करोती कल्याणम्’ म्हणत होते, तसेच ते जेव्हा दूध पित होते, तेव्हा शरद पवार साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे देवेंद्र ‘फसव’णीस यांची शरद पवार यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. त्यांनी आपली लायकी ओळखून आपल्या बरोबरीच्या नेत्यांवर टीका करावी, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनांतर्गत बुधवारी वारजे येथे निषेध सभा घेण्यात आली. या सभेत मुंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाजपच्या वर्धापनदिनी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा उल्लेख करून ‘मोदींच्या नादाला लागाल, तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नाही’, अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना, मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री फसणवीस यांनी टीका करताना आपले वय आणि समोरच्या नेत्याचे वय ओळखून लायकीप्रमाणे टीका करणे गरजेचे आहे. शरद पवार साहेबांवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. भविष्यात पवार साहेबांवर टीका केली तर गाठ राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि आमच्याशी आहे, असा इशाराही दिला. 

केंद्र आणि राज्य शासनावर टीका करताना मुंडे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारचा खोटारडेपणा आणि फसवणुकीच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. ‘फसव’णीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, राज्य भ्रष्टाचारमुक्त करू, राज्याचा कारभार पारदर्शक करू, अशी फसवी आश्वासने दिले. प्रत्यक्षात त्यांच्या 16 मंत्र्यांनी सत्तेत आल्यापासून विविध घोटाळे करून कोट्यवधी रुपये स्वतःच्या घशात घातले. त्यात आमच्या भगिनी पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. त्यांनी लहान मुलांच्या चिक्कीतील पैसे खाल्ले. सध्याचे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.  

अण्णा हजारेंच्या दिल्लीतील आंदोलनामुळे देशात परिवर्तनाची लाट आली. या लाटेचा फायदा भाजपने घेतला. मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा घराघरात आणि गावागावांत होत आहे. मोदी सरकारमधील मंत्री ‘अच्छे दिन’ची चेष्टा करत आहेत. काही मोदी भक्तांना अजूनही वाटतंय लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी वीस-पंचवीस हजार तरी देतील. असेच चालले तर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार नाहीत, तर प्रत्येकाच्या डोक्यावर पंधरा लाखांचे कर्ज मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या तरुणांनी मोदींना देशाच्या सिंहासनावर बसविले, त्या तरुणांनाच मोदींनी रोजगार न देता फसविले आहे. महापुरुषांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडण्याचा नवा फंडा निघालेला आहे. संघ सोळाव्या शतकात अस्तित्वात असता, तर या लोकांनी शिवाजी महाराज यांचाही संघाशी संबंध जोडला असता. फसव्या योजनांना शिवाजी महाराजांचे नाव देऊन सत्ताधार्‍यांकडून महाराजांचा अवमान केला जात आहे. सन्मान करता येत नसेल तर अवमान तरी करू नका, असे मुंडे म्हणाले. 

Tags : Pimpri, Pune, Chief Minister, identify,  suit, criticize,