होमपेज › Pune › शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बोलावली बैठक

शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बोलावली बैठक

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:04AMपिंपरी ः प्रतिनिधी

शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार दि.19 व दि.20 जुलै रोजी नागपूर येथे बैठक बोलावली आहे.  बैठकीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बोलविले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शास्तीकराचा निर्णय झाला असला तरी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याशिवाय प्राधिकरणातील साडेबारा टक्के जमीन परतावा, रिंगरोड प्रश्न, पवना बंद पाईप लाईन, शहर विकास आराखड्यातील फेरबदलाचे प्रस्ताव, नदी सुधार प्रकल्पाला मंजुरी असे अनेक प्रश्न राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित आहेत.

एकेकाळचे अजित पवार यांचे खंदे समर्थक लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचा रस्ता धरला. आमदार जगताप आज भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. तर महेश लांडगे हे संलग्न आमदार आहेत. गेल्या 4 वर्षापासून हे दोन्ही आमदार शहराच्या प्रलंबित प्रश्नासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र शहरवासीयांचे पदरी  काही पडले नाही.लोकसभा, विधानसभा निवणुक तोंडावर असल्याने मुख्यमंत्री याबैठकीत काही महत्वाचे निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.