होमपेज › Pune › चाकण मेट्रो मार्गाचाही डीपीआर

चाकण मेट्रो मार्गाचाही डीपीआर

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:47AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडीपाठोपाठ आता कासारवाडीतील नाशिक फाटा चौक ते चाकण या मार्गावरही मेट्रो धावणार असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठीचा 3 कोटी 48 लाख 72 हजार रुपये अधिक 12 टक्के जीएसटी असा सुमारे 3 कोटी 50 लाखांचा खर्च पालिका करणार आहे.

स्वारगेट ते पिंपरी या पुणे मेट्रो कामाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्गिका तयार करण्याची शहरातील नागरिकांसह सामाजिक संस्था, संघटना व सर्वच राजकीय  पक्षांची आग्रही मागणी आहे. शहरवासियांचा आग्रह लक्षात घेऊन पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गिकेचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिल्या आहेत.त्यानंतर नाशिक फाटा ते चाकण या भोसरी व मोशीमार्गे मेट्रोचा डीपीआर तयार करण्याची मागणी समोर आली. नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्गाच्या (एमएच-4) कामामध्ये मेट्रोसाठीची जागा ठेवून काम करण्याबाबत खासदार, आमदार व पालिका पदाधिकार्‍यांनी मागणी केली आहे. 

यासंदर्भात 2 जानेवारीला आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत मेट्रो व राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी व पालिका पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत पिंपरी ते निगडी व नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना मेट्रोला देण्यात आल्या होत्या. त्याचा खर्च पालिका करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर मेट्रोने 19 मार्चला पत्राद्वारे पुणे मेट्रो प्रकल्प टप्पा दोनसाठी डीपीआर तयार करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली असून, हे काम 8 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 84 लाख 72 हजार अधिक 12 टक्के जीएसटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे मेट्रोने कळविले आहे. डीपीआर तयार करण्याचे काम 31 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे.ही रक्कम पालिकेच्या अर्थसंकल्पातील 50 कोटीच्या निधीतून देण्यात येणार आहे. ही रक्कम करारनामा न करता थेट पद्धतीने अदा करण्यात येणार आहे.

Tags : Pune, Pimpri, Chakan, Metro, Road, DPR