Thu, Apr 25, 2019 03:43होमपेज › Pune › भाजपमधील मंडलांचा कारभार थंड

भाजपमधील मंडलांचा कारभार थंड

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:01AMपिंपरी ः संजय शिंदे

बुथ रचना सक्षम करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीमध्ये मंडल व त्यांच्या कार्यकारिणीकडे असते; परंतु पिंपरी-चिंचवड शहरात सहा मंडलांचा कारभार सद्यस्थितीला धिम्या गतीने सुरू असल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. ‘वन बुथ टेन युथ’ सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार सुचना येत आहेत; मात्र औद्योगिकनगरीतील मंडले आणि त्याचे मंडलाध्यक्षांबरोबरच विविध कार्यकारिणी फक्त नावालाच आहेत की काय अशी शंका आता पक्षातून व्यक्त होते आहे. त्यामुळे भविष्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंडलांचा कारभार सुधारण्यासाठी शहर स्तरावर लक्ष दिले पाहिजे असा सुर पक्षातून उमटत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पिंपरी-दापोडी, चिंचवड-प्राधिकरण, चर्‍होली-भोसरी, निगडी-तळवडे, सांगवी-काळेवाडी, थेरगाव-किवेळे ही सहा मंडले कार्यान्वित आहेत. महेंद्र बाविस्कर, अण्णा गर्जे, संतोष लांडगे, अजय पाताडे, प्रमोद ताम्हणकर आणि काळुराम बारणे हे सहजण मंडलाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. मंडलाकडे प्रामुख्याने सभासद नोंदणी, पक्षाने दिलेले कार्यक्रम तळागळापर्यंत पोहचविणे, मंडल, प्रभाग निहाय कार्यकारिणी नेमणे, त्यांच्याकडून पक्षवाढीसाठी काम करुन घेणे , ‘वन बुथ टेन युथ’ प्रभावीपणे राबविण्याचे काम मंडलाकडे असते.

पार्टी हायटेक झाल्यामुळे आम्हाला निरोप दिले जात नाहीत. त्यामुळे आमची पक्षाला गरज नसल्याचे मंडलाध्यक्षांकडून ऐकावयास मिळत आहे. प्रदेशस्तरावरुन, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पक्षाच्या हिताचे एसएमएस येतात; परंतु शहर स्तरावरुन एसएमएस येत नाहीत. मंडलांतर्गत विविध समित्या आहेत. त्यांच्या निवडी ही जाहीर करण्यात आल्या आहेत; परंतु ही पदे फक्त नावालाच आहेत. त्याअनुषंगाने पक्षाकडून कोणतेच काम या ध्येय-धोरणे न दिल्यामुळे युवा पदाधिकारी, कार्यकर्ते फक्त पदाच्या नावालाच असल्याची चर्चा त्यांच्यामध्ये आहे.

चार वर्षे पूर्ण झाली म्हणून पक्षाच्यावतीने शहरातील विविध घटकांवर प्रभूत्व असणार्‍या  ‘की व्होटर’ यांना भेटण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात केलेल्या विकास कामांचे मॉडेलरुपी पत्रक संबंधितांच्याकपर्यंत पोहचवून त्यावर त्यांची मतेमंतांतरे अजमाविण्यात येणार आहेत. सध्या पालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. पक्ष संघटना 77 नगरसेवकांच्या माध्यमातून मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात असे चित्र भासविण्यात येत आहे; मात्र जोपर्यंत मंडलास्तरावर आणि प्रभागस्तरावर पक्ष सक्षम होणार नाही तोपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे तळागळापर्यंत पोहचणार नाहीत त्यासाठी शहरातील मंडले सक्षम करण्यासाठी शहरस्तरावरुन प्रयत्न झाले पाहिजेत अशा विचार पुढे येत आहे. 

काम योग्य पदध्तीने सुरू ः थोरात

शहरातील सहा मंडलांचा कारभार सुधारावा म्हणून सरचिटणीसांच्याकडे मंडलांचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून येणार्‍या विविध योजना, अभियान तळगळापर्यंत पोहचविण्याचे काम जोरदार सुरू आहे. ज्याठिकाणी काम होत नाही तेथे सरचिटणीस जातीने लक्ष देत आहेत असे शहर प्रवक्ता अमोल थोरात यांनी सांगितले.