पुणे: प्रतिनिधी
केवळ एका मार्कवरून पहिली संधी हुकलेल्या दत्तवाडी परिसरातील सायली शेंडगे या तरुणीने लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या जेएमएफसी (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी) या परीक्षेत बाजी मारली आहे. त्यामुळे अवघ्या 27 व्या वर्षी सायलीची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. लोकसेवा आयोगाकडून मे 2017 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात सायली हिने 14 वी रँक मिळवली आहे. सायली ही पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष बीपीन पाटोळे यांच्याकडे सरावासाठी होती. पाटोळे यांनी सायलीला मिळालेल्या यशाबदल कौतुक केले आहे.
सायलीने एलएलएमपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. 2014 मध्ये ती ज्यूडिशीअल मॅजिस्ट्रेटची परीक्षा (प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी) पास झाली होती. मात्र केवळ एका मार्कने मेरिट हुकले आणि न्यायाधीश बनण्याची संधी हुकली होती. पण तिने जिद्दीने अभ्यास करत मे 2017 च्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. या यशाबद्दल खूप आनंद होत आहे. न्यायाधीश हे पद मोठ्या मानाचे आणि तेवढ्याच जबाबदारीचे आहे, अशी प्रतिक्रिया सायलीने दिली आहे.
सायली लहानपणापासून अतिशय मेहनती आहे. अभ्यासाबरोबरच ती आमच्या कपड्यांच्या छोट्याशा दुकानात मदत करायची. या दुकानावरच तिन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे मुलगी न्यायाधीश बनल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे, अशी भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली.