Fri, Apr 19, 2019 12:05होमपेज › Pune › ‘त्या’ फोनचा देहूरोड पोलिसांनी घेतलाय धसका

‘त्या’ फोनचा देहूरोड पोलिसांनी घेतलाय धसका

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:27PMदेहूरोड ः उमेश ओव्हाळ

देहूरोड पोलिसांनी सध्या एका फोनचा चांगलाच धसका घेतला आहे. रात्र होताच पोलिस ठाण्याचा फोन घणघणतो. पोलिस सैरभैर होतात. या फोनपासून पिच्छा सोडविण्याचे प्रयत्न सुरू होतात. फोनची रिंग वाजत राहते.. पोलिस रिसिव्हर उचलतात आणि पुन्हा ठेवून देतात. हा सिलसिला बराच वेळ सुरू राहतो... आणि मग उशिरा थांबतो. पोलिस मात्र, सुटकेचा नि:श्‍वास टाकतात. 

देहूरोड पोलिस ठाण्यात मागील काही दिवसांपासून एका अनाहूत फोनने पोलिसांची झोप उडविली आहे. फोन करणारा व्यक्ती रोज रात्री भरपूर नशापान करून पोलिसांना फोन करतो आणि माझा प्रॉब्लेम सोडवा असे सांगत असतो. पोलिस त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो. मग पोलिस वैतागतात, आणि टाळण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच त्या वैताग देणार्‍यावर पोलिस कारवाई का करीत नाहीत असा प्रश्‍न पडतो. पण यामागील गोष्ट थोडीशी वेगळी आहे.   

याबाबत चौकशी केली असता समजले की, देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्‍याचा तो पती आहे. त्यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. पण केवळ तिला त्रास देण्याच्या उद्देशाने तो रोज रात्री नशेत धुंद होऊन पोलिस ठाण्यात फोन करतो. सततच्या या त्रासामुळे संबंधित कर्मचारी वैतागली आहे. तिचा मानसिक त्रास सहकारी पोलिसांनाही जाणवू लागला आहे. केवळ नाजूक नात्याचा बंध विचारात घेऊन पोलिस त्या फोन करणार्‍या महाभागावर कारवाई करण्याचे टाळतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात ज्या भागातून तो फोन करतो, तेथील पोलिसांद्वारे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर काही दिवस हे प्रकार थांबले, पण पुन्हा ते सुरू झाले. 

आता तर त्याचा फोन क्रमांक पोलिसांना पाठ झाला आहे. त्याचा फोन उचलून ठेवण्याशवाय पोलिसांकडे पर्याय नसतो. पण, याच वेळात एखाद्या गरजवंताचा फोन आल्यास काय करणार या भावनेने फोन सुरू ठेवला जातो. आणि तो वारंवार फोन करतच राहतो. चुकून एखाद्याने फोन रिसिव्ह केलाच तर त्यांना शिव्यांचा प्रसाद हमखास मिळतो. पण तरीही मोठ्या संयमाने पोलिस हा त्रास सहन करीत आहेत.