Fri, Mar 22, 2019 06:17
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › उद्योगनगरीत पुणे ऐवजी चक्क ‘नागपूर मेट्रो’

उद्योगनगरीत पुणे ऐवजी चक्क ‘नागपूर मेट्रो’

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:48PMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात 7.50 किलोमीटर अंतर पुणे मेट्रो धावणार आहे. त्याचे काम वेगात सुरू आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात बॅरिकेट्स लावून नुकतेच काम सुरू करण्यात झाले आहे. त्या लोखंडी बॅरीकेटसवर ‘पुणे मेट्रो’ ऐवजी चक्क ‘नागपूर मेट्रो’ असे ठसठशीत लिहिले आहे. त्यामुळे मेट्रोचे नाव बदललेले की काय असा सवाल शहरवासीयांना पडला आहे. 

शहरात मेट्रोचे काम एप्रिल 2017 ला सुरू झाले. मेट्रो पहिला पिलर (खांब) शंकरवाडी, कासारवाडी येथे उभा राहिला. तर, पिलरवर सेगमेंट जुळणीही प्रथम खराळवाडी येथेच झाली.दापोडी ते मोरवाडी, पिंपरी या मार्गावर आतापर्यंत पूर्ण उंचीचे 114 पिलर उभे राहिले आहेत. दररोज कामातील बदल व प्रगती नागरिकांना दिसत आहे. 

कामांच्या अंतर्गत कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात मेट्रोचे काम नुकतेच सुरू झाले आहे. कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या समोर पिलर व ‘नाशिक फाटा- भोसरी’ मेट्रो स्टेशनचे काम आहे. त्यासाठी सर्व्हिस रस्ता व ग्रेडसेपरेटरमधील एक लेन लोखंडी पत्र्याच्या बॅरिकेटसने बंद करण्यात आली आहे. या बॅरिकेटसवर ‘पुणे मेट्रो’ ऐवजी ‘नागपूर मेट्रो’ असे लिहलेले आहे. त्यामुळे वाहनचालक अचंबित होत आहेत. पुणे मेट्रोचे नाव बदलून ‘नागपूर मेट्रो’ केले की या प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

पुण्याहून पिंपरीच्या दिशेने येणार्‍या मार्गावर कासारवाडी भुयारी मार्ग ते नाशिक फाटा चौकापर्यंतही लोखंडी बॅरिकेटस लावून मेट्रोचे काम महिन्याभरात सुरू केले जाणार आहे. मेट्रोचे पिलर ग्रेडसेपरेटर व सर्व्हिस रस्त्याच्या मध्यात उभे राहणार आहेत.  त्यामुळे सर्व्हिस मार्ग अधिक अरूंद होऊन वाहतुक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. 

या संदर्भात मेट्रो प्रकल्पाचा अधिकार्‍यांनी सांगितले की, महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नागपूर मेट्रोचे काम सुरू आहे. याच कंपनीतर्फे पुणे मेट्रोचे कामही सुरू आहे. नागपूरमध्ये पुण्याअगोदर काम सुरू झाल्याने तेथील अनुभव येथे कामी येत आहे. आवश्यकतेनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कामाच्या तंत्रज्ञानात बदल केले जात आहेत. अधिक प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. 

तसेच, सेगमेंट लॉचिंग गर्डर मशिनही नागपूर येथे मागविण्यात आले आहेत. त्याची जुळणी पिंपळे गुरव येथील कॉस्टिंग यार्ड येथे केली जात आहेत. जुळणी तसेच, काही आवश्यक बदल करून सदर मशिनद्वारे सेगमेंट जुळणीचे काम केले जाणार आहेत. 

बॅरिकेट्सवरील स्टिकर्स काढून पुणे मेट्रोचे लावणार

नागपूर येथे काम पूर्ण झालेल्या ‘नागपूर मेट्रो’ मार्गावरील बॅरिकेटस काढून पुण्यात आणण्यात आले आहेत. वाहतूक सुरक्षेसाठी ते रस्त्याच्या कडेला लावण्यात येत आहेत. बॅरिकेटसवरील नागपूर मेट्रो असलेले स्टिकर्स काढून त्यावर पुणे मेट्रोचे स्टिकर्स लावण्यात येत आहेत, असे पुणे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले.