Mon, Aug 19, 2019 01:32होमपेज › Pune › अधिकारी नसतानाही ‘टेमघर’चे काम सुरूच!

अधिकारी नसतानाही ‘टेमघर’चे काम सुरूच!

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:20AMवेल्हे : प्रतिनिधी

खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरणाची गळती बंद करण्याचे काम वरिष्ठ अधिकार्‍यांविना सुरू आहे; त्यामुळे गळती बंद करण्याचे काम योग्य दर्जाचे होते आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, टेमघर प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र कुंजीर यांनी टेमघर धरणाची गळती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व दर्जेदारपणे बंद केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे टेमघर धरण देशभर चर्चेत आहे. टेमघर धरणाची गळती बंद करण्याचे काम योग्य दर्जाने करून घेणारे भामा आसखेड जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हणुमंत धुमाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीच्या विरोधात या धरणाच्या दुरुस्तीच्या कामात त्यांचे सहकारी असलेल्या सहकारी अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे फियार्र्दही मांडली. टेमघर म्हणजे ‘पुणेकरांच्या उशाला असलेला बॉम्ब’ बनले आहे. त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीनेच झाली पाहिजे. ते काम धुमाळ अतिशय योग्य पद्धतीने करवून घेत होते, असा उल्लेख या सहकारी अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आवर्जून केला होता; मात्र, या पत्रावर मुख्यमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने अद्याप काहीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. सरकारने टेमघर प्रकरणी झोपेचे सोंग घेतले आहे काय, असा सवाल उपस्थित होतो आहे.

हणमंत धुमाळ यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. भामा आसखेड जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे हेच वरिष्ठ अधिकारीपदाचा कार्यभार गेल्या तीन आठवड्यांपासून सांभाळत आहेत. गळती बंद करण्याचे काम योग्य दर्जाचे व्हावे यासाठी, दर चार-पाच दिवसांनी केलेल्या कामाच्या दर्जाची तपासणी गुणवत्ता दक्षता पथकाकडून केली जात आहे. टेमघर धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती होणार्‍या  ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सिमेंट व इतर रसायन ओतून गळतीची ठिकाणे बंद केली जात आहेत. गेल्या वर्षी गळती बंद केलेल्या ठिकाणची गळती बंद करण्यात यश मिळाले; त्यामुळेच यंदा त्याच गुणवत्तेने काम केले जात असल्याचे टेमघर धरण जलसंपदा विभागातून सांगण्यात आले; मात्र धुमाळ यांच्या अनुपस्थितीत आता होत असलेल्या कामाच्या दर्जाबाबत खात्री देता येईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या काळात मुठा नदीवर टेमघरच्या बांधकामास सुरुवात झाली.  सुरुवातीपासून धरणाचे काम अनेक वादांत अडकले; त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अद्याप पूर्ण क्षमतेने धरणात पाणीसाठा झाला नाही. टेमघर धरणाची पाणी साठवणक्षमता 3.71 टीएमसी असून, गळतीमुळे धरण गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात कोरडे पडत आहे.  गेल्या दोन वर्षांपासून गळती बंद करण्याचे काम सुरू असल्याने पावसाळ्यातही टेमघरमध्ये अर्धाच पाणीसाठा केला जात आहे. पावसाळा संपताच धरण कोरडे केले जाते; त्यामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील एक कोटी नागरिक तसेच हजारो हेक्टर शेतीला टेमघरच्या गळतीचा फटका बसत आहे.  

वरिष्ठ अधिकार्‍यांविना टेमघर धरणाची गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 250 मजूर, यंत्र सामग्रीच्या मदतीने टेमघरची गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. मोठ्या धरणाच्या भिंतीतील गळती प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बंद केली जात असल्याने कामाची पाहणी करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ अभियंते, तंत्रज्ञ येत आहेत. गेल्या वर्षी टेमघरची 40 टक्के गळती बंद करण्याचे काम करण्यात आले. यंदा पावसाळ्यापूर्वी 40 टक्के गळती बंद करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. उर्वरित काम पुढील वर्षी पूर्ण केले जाणार आहे.   गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही गळतीमुळे टेमघर धरण कोरडे करण्यात आले; त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील पाण्यावर पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिकांची तहान; तसेच जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीची तहान भागवली जात आहे. 

पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना तसेच हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यांतील 66 हजार हेक्टर शेतीला खडकवासला धरणसाखळीशिवाय पर्यायी पाणी  व्यवस्था अद्याप सुरू झाली नाही. भामा आसखेडचे पाणी अद्याप वादात अडकले आहे; त्यामुळे खडकवासला धरणसाखळीवरच एक कोटी नागरिक व हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या टेमघर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणे आवश्यक बनले आहे.