होमपेज › Pune › ४२५ कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा प्रकरण :मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

४२५ कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा प्रकरण :मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

Published On: Jan 25 2018 1:19AM | Last Updated: Jan 24 2018 11:01PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने 425 कोटींची रस्ते विकासाच्या कामांत रिंग झाली असून, सत्ताधार्‍यांनी करदात्यांची 90 कोटींची लूट केली आहे, असा आरोप शिवसेनेसह राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत असून, याची दखल घेण्याची मागणी भाजपाच्या खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांकडून 425 कोटींच्या कामाचा सविस्तर अहवाल मागविला आहे.

‘भय व भ्रष्टाचारमुक्ती’चा नारा देणार्‍या भाजपाच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिकेत लूट सुरू आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तब्बल 425 कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यात ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून रिंग करण्यात आली. यातून सत्ताधार्‍यांनी करदात्यांच्या 90 कोटींची लूट केली आहे, असा आरोप शिवसेनेच्या खासदारांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकरणात आयुक्तही सामील असून, ते सत्ताधार्‍यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 425 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहेत. यामुळे सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्यातच या आरोपांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पक्षावर होणार्‍या आरोपांची दखल घेण्याची मागणी भाजपाच्या  एका खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. 

खासदाराच्या पत्राची  मुख्यमंत्र्याकडून दखल

खासदाराच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. त्यांनी 425 कोटींच्या रिंग प्रकरणाची सविस्तर माहिती मागविली. त्याचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच पाठविण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.