Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Pune › मनपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर

मनपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या कामांचा दर्जा हळूहळू खालावण्यास सुरुवात झाली की, प्रशासनाकडूनच एस्टिमेट फुगविले जाते, असे वारंवार निदर्शनास येऊ लागले आहे. विकासकामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी दराच्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून प्रशासनाकडून अगदी 38 टक्क्यांपर्यंत कमी दराने आलेल्या निविदा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे निविदा प्रकियेतील रिंग, एस्टिमेटची वास्तविकता आणि कामांच्या दर्जाबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिका प्रसासनाकडून विकासकामांसाठी लागणार्‍या वस्तूंच्या दरपत्रकानुसार (डीएसआर) विकासकामांचे एस्टिमेट तयार केले जाते. प्रामुख्याने एस्टिमेट करताना कामासाठी लागणारा कालावधी, भविष्यातील भाववाढ, मजुरी आणि ठेकेदाराचा नफा याचाही अंतर्भाव केला जातो. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एस्टिमेट कमिटीच्या बैठकीमध्ये एस्टिमेटला अंतिम स्वरूप देऊन निविदा काढल्या जातात. मात्र, अनेकदा निविदा एस्टिमेटपेक्षा  5 ते 10 टक्क्यांनी कमी-अधिक दराने येतात.  

कमी दराने निविदा आल्यास त्यामध्ये ठेकेदारांनी रिंग केल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावरून सातत्याने आरोप होऊ लागल्यानंतर साधारण दीड वर्षापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 15 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा कमी दराने निविदा आल्यास एस्टिमेट सुधारण्याचे, तसेच फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे कमी दराच्या निविदा भरून, निकृष्ट कामे करण्याच्या प्रकारांना काही काळापुरता चाप बसला होता. मात्र, आयुक्तांच्या या आदेशाचा प्रशासनाला विसर पडलेला दिसतो आहे, अथवा त्यांचे आदेश धाब्यावर बसवून अगदी 20 ते 38 टक्के कमी दराने आलेल्या निविदाही मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे येऊ लागल्या आहेत.

कमी दराच्या या निविदा मंजुरीसाठी

या आठवड्यात होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर रामटेकडी येथील बीएसयूपी योजनेतील इमारतींमधील सदनिकांमध्ये विद्युतविषयक कामांसाठी सुमारे एक कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. चार ठेकेदारांनी निविदा भरल्या. यापैकी मे. सार्थक इलेक्ट्रोमेक प्रा. लि. कंपनीने तब्बल 34.99 टक्के कमी दराने निविदा भरली आहे, तर उर्वरित तीन कंपन्यांनी 15.78 ते 28.99 टक्के कमी दराने निविदा भरल्या आहेत. प्रभाग क्र. 28 ब मध्ये विद्यासागर कॉलनी येथील जागेस सीमाभिंत बांधण्याच्या कामाची 49 लाख 99 हजार रुपयांच्या कामाची निविदा 26.11 टक्के कमी दराने आली आहे. नगर रस्ता हॉटमिक्स प्लांटवर मशिनरी आणि मनुष्यबळ पुरविण्यासाठीची 49 लाख 99 हजार रुपयांची निविदा 28.99 टक्के कमी दराने आली आहे.

लोहगाव परिसरात गरजेप्रमाणे 12 ते 24 इंची ड्रेनेज लाईन टाकून ती नगर रोडच्या ड्रेनेज लाईनला जोडण्याच्या सुमारे 80 लाख रुपयांची निविदा तब्बल 38.80 टक्के कमी दराने आली आहे. वडगाव बुद्रुक येथील प्रभाग क्र. 33 अ मधील अ‍ॅमेनिटी स्पेसवर अद्ययावत अभ्यासिका व क्रीडा हॉल विकसनाची सुमारे 99 लाख 44 हजार रुपयांची निविदा 24.30 टक्के कमी दराने आली आहे. येथीलच स. नं. 54 येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका बांधण्याच्या 99 लाख 71 हजार रुपयांच्या कामाची निविदा 20.65 टक्के कमी दराने आली आहे. बावधन, कोथरूड डेपोअंतर्गत प्र. क्र. 10 ड येथे स्मशानभूमीची ओटा व्यवस्था, शेड उभारण्याच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कामाची निविदा 27.50 टक्के कमी दराने आली आहे. या कार्यपत्रिकेवरील सगळ्या प्रकारावर नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक काय निर्णय घेणार  याकडे आता लक्ष लागले आहे.