Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Pune › भाडेकरू नोंदणी बंद

भाडेकरू नोंदणी बंद

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:14AMपुणे : प्रतिनिधी

शहरात भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्य करत दहशतवादी कारवाई केल्या जात असताना पुणे पोलिसांची ऑनलाईन ‘टेनंट’ हे माहिती भरण्यासाठी असणारे पोर्टल गेल्या महिनाभरापासून बंद असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यातही धक्कादायक प्रकार म्हणजे, पोलिस ठाण्यात याबाबत नोंदणीसाठी गेलेल्या नागरिकांना हुसकावून लावले जात असल्याचेही वास्तव समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे गरजेवेळी घर मालकांना माहिती न भरल्यावरून दम भरणार्‍या पोलिसांना खरच याचे किती गांभीर्य आहे, हे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

शहरात स्थलांतरांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. दरम्यान, शहरात झालेल्या बाँम्बस्फोटानंतर पुणे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघडकीस आले. यातील दहशतवाद्यांनी शहरात वास्तव्य करून हे स्फोट घडवून आणले होते. तर अनेक दहशतवादी तसेच नक्षली कारवाईतील धागेधोरे पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून पुणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाडेकरूंची नोंदणी अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनाही अनेक कामांसाठी ही नोंदणी उपयुक्त ठरते. यापूर्वी ही नोंदणी पोलिस ठाण्यात जाऊन करावी लागत असे. नागरिकांना यासाठी अनेक वेळा पोलिस ठाण्यात चकरा माराव्या लागत असत. तसेच त्यांचा वेळही वाया जात असे. पोलिसांनाही अपुर्‍या मनुष्यबळात हे कामे करावी लागत असे. त्यामुळे गेल्या वर्षात तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी पुणेकरांचा वेळ तसेच पोलिस ठाण्यात न जाता ही माहिती भरण्यात यावी, यासाठी ‘टेनंट इंफॉरमेशन फॉर्म’ या नावाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

त्यात घरबसल्या नागरिकांना भाडेकरूची पूर्ण माहिती भरून घेतली जात असे. तसेच त्याची एक प्रत मिळत असे. त्यानंतर केवळ पोलिस ठाण्यात जाऊन, यावर स्वाक्षरी आणि शिक्का मारून घ्यावा लागत असे. त्यानंतर पुणेकरांचा वेळ वाचत असल्याने या सुविधेला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, पुणेकरांसाठी उपयुक्त असणारी ही सुविधा गेल्या महिन्याभरापासून (28 जुलै) बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांना भांडेकरूंची माहिती भरता येत नसून, अनेकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संकेतस्थळावर गेल्यानंतर ही सुविधा 10 ऑगस्टपासून सुरू होईल, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, 10 ऑगस्टनंतरही ती सुरू झाली नसल्याचे समोर आले आहे. 

संकेतस्थळावर माहिती भरण्याची पद्धत

पुणे पोलिसांच्या punepolice.co.in  या संकेतस्थळावर ‘टेनंट इन्फॉरमेशन फॉर्म या पोर्टलवर जावे लागते. त्यात संबंधित घरमालकाला मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर या क्रमांकावर एक ओटीपी क्रमांक येतो. तो ओटीपी या फॉर्ममध्ये टाकल्यानंतर पुढील माहितीचा फॉर्म ओपन होतो. त्यानंतर संबंधित घरमालकाची माहिती, तसेच भाडेकरूची आधारकार्डसह पूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर या फॉर्मची एक प्रत काढावी. तसेच, संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन या प्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा, लागतो.

सुविधा 8 दिवसांत सुरू करण्याचे आश्‍वासन

दरम्यान, ऑनलाईन सुविधा बंद असल्याने नागरिक पोलिस ठाण्यात जाऊन भाडेकरूंची माहिती नोंदणी करून सही, शिक्का मागत आहेत. मात्र, पोलिसांकडून त्यांना आम्ही फक्त ऑनलाईन भरलेलाच फॉर्म स्वीकारणार असे सांगत परत पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटसने पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. त्यावेळी आयुक्तांनी ही सुविधा आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन सिंघवी यांनी सांगितली.