होमपेज › Pune › अनैसर्गिक कृत्य करणार्‍या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी

अनैसर्गिक कृत्य करणार्‍या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी 

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आठ आणि नऊ वर्षांच्या मुलांना घरात बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍याला नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी सुनावली आहे.  

समीउल्ला शेख ऊर्फ मारवाडी काका (वय 42, रा. पौड फाटा, कर्वे रस्ता) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित 8 वर्षीय मुलाच्या आईने याबाबत कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना 4 एप्रिल 2015 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. दोन्ही मुले पौड फाटा परिसरात राहतात. समीउल्ला एका खोलीत भाड्याने राहत होता. चॉकलेटच्या आमिषाने मुलांना घरात बोलावून त्याने दोघांवर अनैसर्गिक अत्याचार केला.

आरोपीने केलेल्या घृणास्पद कृत्यानंतर फिर्यादींच्या 8 वर्षांच्या मुलाला ताप आला. परंतु,  उपचार करूनही त्याला बरे वाटत नव्हते. त्याच्या आईला तो घाबरलेल्या मन:स्थितीत असल्याचे जाणवले. त्यांनी याबाबत विश्वासात घेऊन त्या मुलाला विचारले. त्यावेळी त्याला आणि शेजारच्या नऊ वर्षांच्या मुलाला खोलीत बोलावून समीउल्ला याने अत्याचार केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी दुसर्‍या पीडित मुलाच्या आईला याबाबत सांगितले. त्यावेळी त्या मुलालाही ताप आला आहे. तोही समीउल्ला याने अत्याचार केल्याचे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत पोलिसांत फिर्याद देण्यात आली.

त्यानुसार कोथरूड पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोन्ही पीडित मुलांची आणि दोन डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. यावर सुनावणी करीत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 377 (अनैसर्गिक कृत्य) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावली. दंडापैकी दोन्ही मुलांना प्रत्येकी 7 हजार रुपये नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. त्याने दंड न भरल्यास मुलांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करता येणार आहे.