Sun, Jan 20, 2019 20:58



होमपेज › Pune › पिंपरीत दहा झोपड्या आगीत जळून खाक

पिंपरीत दहा झोपड्या आगीत जळून खाक

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 12:55AM



पिंपरी : प्रतिनिधी

स्वयंपाक झाल्यानंतर चूल व्यवस्थित न विझविल्यामुळे पिंपरीत झोपड्यांना आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी वाघेरे कॉलनी येथे कामगारांच्या झोपड्यांना बुधवार (दि. 28) रोजी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे दहा झोपड्या खाक झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची तत्काळ माहिती दिली. त्यानुसार पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारी असलेल्या सुमारे 15-20 झोपड्या आगीपासून वाचल्या आहेत. वाघेरे कॉलनी येथे रिकाम्या जागेत बिगारी काम करणारी अनेक कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे कर्नाटकवरून पुण्यात रोजी-रोटी कमाविण्यासाठी आली आहेत. रोजच्याप्रमाणे झोपड्यांमधील सर्व जण कामावर गेले असता आज दुपारी एकच्या सुमारास एका झोपडीतून अचानक धूर निघाला.

घरी असलेल्या काही महिलांनी जवळ जाऊन बघितले असता झोपडीमधील सर्व वस्तूंनी पेट घेतला होता. महिलांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र क्षणात आग आजूबाजूला पसरली. यामध्ये शेजारी असलेल्या सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या. चुलीमधला विस्तव स्वयंपाक झाल्यानंतर व्यवस्थित न विझविल्यामुळे वार्‍याने त्याची ठिणगी उडून आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.