Mon, Jul 22, 2019 00:50होमपेज › Pune › ‘दहा’चे नाणे बँकेनेच नाकारले

‘दहा’चे नाणे बँकेनेच नाकारले

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:46PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

बँकेत पैसे ठेवण्यास जागा नसल्याचे कारण देत बँकेनेच दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्याचा प्रकार निगडी येथे घडला आहे.

मध्यंतरी दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्याने अनेक व्यापार्‍यांनी हे नाणे स्वीकारणे बंद केले. याबाबत ‘पुढारी’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. रिझर्व्ह बँकेने हे नाणे बंद झाले नसल्याचा खुलासा केला, तरीही काही जण अजूनही आडवळणाने दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत असून, त्यासाठी वेगवेगळी कारणे शोधत असल्याचे समोर आले आहे.  

राजेंद्र धोंडिबा वाकचौरे हे आज सकाळी साडेअकरा वाजता कॉसमॉस निगडी प्राधिकरणाच्या शाखेमध्ये  निगडी येथे पैसे भरण्यासाठी गेले. चलन भरून स्क्रोल करून पैसे घेऊन कॅश काउंटरवर गेले; परंतु त्यांनी पैसे बघितल्यानंतर पैसे घेण्यास नकार दिला; कारण विचारले असता बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी जागा नाही, म्हणून पैसे जमा करून घेणार नाही,  असे सांगितले.

याबाबत वाकचौरे म्हणाले की, मी त्यांना तसे लेखी द्या, असे म्हणालो; परंतु बँक लेखी द्यायला तयार नाही. हे पैसे तुम्ही मार्केटमध्ये वापरा, असे कॅशियरने सांगितले.  माझ्याकडे 820 दहाची नाणी आहेत. हे पैसे मी दहा-दहा रुपये करून जमा केले आहेत. बँक ते स्वीकारत नाही, हे चुकीचे आहे.