Mon, May 27, 2019 07:34होमपेज › Pune › बस चालकाला दहा वर्षे सक्‍तमजुरी

बस चालकाला दहा वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

वारजे येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिकणार्‍या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्‍या शाळेच्या बस चालकाला विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी दहा वर्षे सक्‍तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संदीप शिवाजी कुंभार (30, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे शिक्षा झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. याबाबत सहा वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2014 ते 13 नोव्हेंबर 2014 दरम्यान आरोपी चालवत असलेल्या शाळेच्या बसमध्ये घडला.

फिर्यादींना यांना दोन मुली आहेत. त्यांची सहा वर्षांची मोठी मुलगी वारजे येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना शाळेच्या बसवर असलेला चालक संदीप कुंभार इतर मुला-मुलींना बसमधून उतरविल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होत असल्याचे तिच्या आईने विचारले.  त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलिस उपनिरीक्षक मीनल नाईक यांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारपक्षाने आठ साक्षीदार तपासले. न्यायालयाने पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण धरत संदीपला दहा वर्षे सक्‍तमजुरी सुनावली. सरकार पक्षातर्फे सुनील मोरे आणि स्मिता देशमुख यांनी काम पाहिले.

शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर 

या घटनेत बस चालकाने पीडित मुलीवर केलेल्या अत्याचारानंतर स्कूलबसमधून शाळेत जाणार्‍या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. अशा अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती; तसेच या प्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणार्‍या सुरक्षेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत कडक नियमावली घालून देण्यात आली होती.

बलात्कार्‍याला सात वर्षे शिक्षा

पुणे : प्रतिनिधी 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी सुनावली आहे. आरोपीने जरी घटनेनंतर तिच्याबरोबर विवाह केला असला तरी त्यामुळे घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

बंटी सूर्यकांत पाटील (वय 24 रा. लक्ष्मी निवास, कळस माळवाडी, विश्रांतवाडी) याला शिक्षा सुनावण्यात आली. बलात्कारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीने तिच्याबरोबर लग्न केले. मात्र घटनेच्या वेळी ती अल्पवयीन असल्याचा मुद्दा गंभीर होता, असे सरकार पक्षाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. पीडिता 16 वर्षापेक्षा कमी वयाची होती. आरोपीला ती अल्पवयीन आहे हे माहित असूनही  तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले होते. त्यातून गरोदर राहिली होती. मात्र तिने घरी सांगितले नव्हते. 

दि. 27 जानेवारी 2017 रोजी ती घरातील स्वच्छतागृहात गेली. मात्र ती बराच वेळ बाहेर आली नाही. म्हणून तिच्या आईने तिला आवाज दिला. तिने दरवाजा उघडला असता तिला मुलीचा गर्भपात झाल्याचे दिसले. त्यांनी तिला आणि गर्भाला तातडीने ससून हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे डॉक्टरांनी गर्भाला मृत घोषित केले.  पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी केला. अतिरिक्‍त सरकारी वकील प्रेम आगरवाल यांनी याप्रकरणी काम पाहिले. कोर्टकामी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार के. बी. जगताप यांनी सहाय्य केले.