Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Pune › रोकेम प्रकल्पाला आग लागल्याने तात्पुरता बंद

रोकेम प्रकल्पाला आग लागल्याने तात्पुरता बंद

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:04AMमुंढवा : रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये दररोज सातशे टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, या ठिकाणी दररोज फक्‍त 300 ते 350 टन कचर्‍यावर प्रक्रिया होत होती. मागील दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी ‘आरडीएफ’ला लागलेल्या आगीमध्ये येथील यंत्रसामुग्रीचे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून हा कचरा प्रकल्प बंद आहे. येत्या दोन महिन्यामध्ये हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रकल्पामध्ये येणार्‍या कचर्‍यापैकी 40 टक्के ओला व 60 टक्के सुका कचरा येतो. ओल्या कचर्‍यापासून शेतीसाठी खत बनविले जाते. शेतकरी व ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना ट्रॅक्टरची एक ट्रॉली 500 रुपये या दराने विकली जाते. उर्वरित 60 टक्के सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून आरडीएफ (रिफ्यूज डिराइव्हड् फ्युएल) तयार केले जाते. आरडीएफ हा ज्वलनशील घटक असून, त्याचा वापर वीजनिर्मितीच्या भट्टीसाठी केला जातो. कंपन्यांना एक ते दीड रुपया प्रतिकिलो या दराने त्याची विक्री केली जाते. 

मागील सहा वर्षांपासून येथे रोकेम प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी कचर्‍याची ने-आण करताना रामटेकडी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा सांडला जातो. रस्त्यावर सांडलेला कचरा व प्रकल्पातून येणारी दुर्गंधी यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकल्प बंद करण्यासाठी रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट व येथील रहिवाशांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. 

रोकेम प्रकल्पाविषयी  दोन वर्षांपुर्वी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. या लक्षवेधी सूचनेमध्ये काय माहिती विचारण्यात आली होती. त्याला पालिकेने काय उत्तर दिले. याविषयी नागरिकांनी पालिकेकडे विचारणा केली असता, प्रकल्पातील अनियमितपणाविषयी ही लक्षवेधी मांडण्यात आली होती असे अधिकारी सांगतात. मात्र, अनियमितपणा कशाविषयी व कोणी केला याचे उत्तर पालिका अधिकार्‍यांकडून दिले जात नाही.