Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Pune › गळक्या टेमघर धरणाची बिळेही कमकुवत राहणार

गळक्या टेमघर धरणाची बिळेही कमकुवत राहणार

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:42AMपुणे/खडकवासला : दत्तात्रय नलावडे

खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी चालू असलेले दुरुस्तीचे काम मूळ बांधकामातील भ्रष्टाचाराच्या भगदाडांप्रमाणेच ‘गळके’ राहण्याची शक्यता आहे. कारण गळती बंद करताना कंत्राटदारांच्या ‘रिंग’ला वेसण घालणार्‍या अधिकार्‍याची तडकाफडकी बदली केल्यानंतर हे काम वरिष्ठ अधिकार्‍यांविनाच ‘चालू’ ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, अधीक्षक अभियंता हणमंत धुमाळ यांची अचानक बदली करवून घेणार्‍यांचे फावले असून धरणाची भिंत भक्कम होण्याबाबत शंका वाटू लागली आहे. तसेच तब्बल 3. 71 टीएमसी क्षमतेचे टेमघर धरण यंदाच्या पावसाळ्यात तर राहोच, भविष्यातही कधी भरून वाहण्याची शक्यता दिसत नाही.   

‘पुणेकरांच्या उशाला टेमघर धरणाचा बॉम्ब’ असे वृत्त दैनिक पुढारीत (5 फेब्रुवारी) प्रसिद्ध झाले होते. टेमघर धरणाची गळती रोखण्याच्या कामात हितसंबंधी मंडळींना चंचुप्रवेश करू न देता नियमानुसार आणि पारदर्शी पाद्धतीने काम करणार्‍या अधीक्षक अभियंत्याची अचानक बदली करण्यामागे गौडबंगाल असल्याचे त्यात सूचित केले होते.

या स्थितीत दुरुस्ती केल्यास हे धरण भविष्यकाळात लाखो पुणेकरांच्या जिवावर बेतू शकते, असा इशारा तीन कर्मचारी संघटनांच्या वतीने तब्बल 136 जणांच्या स्वाक्षर्‍यांसह मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. तरीही त्याची दखल घेतली न गेल्याने गळके धरण पुणेकरांच्या माथी मारणार्‍या आघाडी सरकारच्या कारकिर्दीचीच ‘री’ युतीच्या राजवटीत ओढली जाणार की काय, असे बोलले जाऊ लागले आहे.