Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Pune › ‘पोलिओ’ मोहिमेसाठी मिनीरेफ्रीजिरेटर ‘नूतन’च्या विद्यार्थ्यांकडून  तंत्रज्ञान विकसित 

‘पोलिओ’ मोहिमेसाठी मिनीरेफ्रीजिरेटर ‘नूतन’च्या विद्यार्थ्यांकडून  तंत्रज्ञान विकसित 

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:56PMपिंपरी : वर्षा कांबळे

तळेगाव दाभाडे येथील नुतन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोलिओ मोहिमेदरम्यान औषध सुस्थितीत ठेवण्यासाठीच्या  मिनीरेफ्रीजिरेटरचे तंत्रज्ञान विकसित  केले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रकल्पात ‘पेल्टीअर इफेक्ट’ या तंत्राचा वापर करून औषध आहे त्या परिस्थितीत जतन करणे शक्य होते. ज्यामध्ये सध्या बर्फाचे खडे आजूबाजूला ठेऊन औषध टिकविले जाते. प्राची शेवकारी, हर्षद शिंदे, रोहन झिंगाडे या तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना ‘ग्याजेट्रोन ’ प्रकल्प स्पर्धेत मांडली. 

‘थर्मो इलेक्ट्रिकल फ्रिजर फॉर मेडीकल अ‍ॅप्लिकेशन युझिंग पेल्टिअर’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. यामध्ये कोणताही गॅस न वापरता हा फ्रिज बनविण्यात आला आहे. पेल्टिअर इफेक्टचा वापर करुन थंड करणारी बाजू आतमध्ये लावून चीपचा वापर करण्यात आला आहे. हा पोर्टेबल असून पूर्णपणे बॅटरीवर चालतो. यासाठी लाकडाचा बॉक्स तयार करुन त्याला दोन एक्झिस्ट फॅन बसविण्यात आले आहे. या फ्रिजचे ‘कुल टु हॉट’ मध्येही रुपांतर करता येते. यामध्ये तापमान सेट करता येते. हा पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. 

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामधील स्पर्धेमध्ये या प्रकल्पास  प्रा. एस. बी. चोपडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रा. निता कराडकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले तर प्रा. सारिका एन. पाटील यांनी समन्वयक म्हणून काम केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

आम्ही बनविलेले मॉडेल हे बॅटरीवर चालणारे आहे. यामध्ये पेल्टिअर मॉडेल युज केले आहे. यामध्ये छोटी चीप असते ती एका बाजसू थंड व एका बाजूस गरम करते. त्यापासून आम्हाला एक कल्पना सुचली. आम्ही यामध्ये थंड बाजू आतमध्ये ठेवली आहे. आणि दोन एक्झिस्ट फॅन बसविले. एक फॅन गरम हवा बाहेर टाकेल आणि एक थंड हवा आत घेईल. त्यामुळे बॉक्समध्ये बर्फ तयार होईल. हा आपल्या सर्वसाधारण फ्रिजसारखा वापरता येऊ शकतो. याचे तापमान कमी जास्त करता येते. - हर्षद शिंदे, अभियांत्रिकी विद्यार्थी