Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Pune › तंत्रज्ञानाच्या जमान्यातही गुरूच हायटेक

तंत्रज्ञानाच्या जमान्यातही गुरूच हायटेक

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 11:33PMभोसरी : विजय जगदाळे

गुरू-शिष्याचे नाते काळाच्या ओघात बदलत आहे. काही प्रमाणात तंत्रज्ञानामुळे विविध माहिती मिळत आहे. मात्र जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम गुरूंमुळेच होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगातही गुरूच हायटेक असल्याची भावना पिंपरी- चिंचवडमधील मान्यवरांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत

शिक्षकांची जागा सोशल मीडियाने घेतली असल्याचे दिसत आहे. शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. त्याचबरोबर गुरू-शिष्य संबंधातील पवित्र भावनाही  लोप पावत आहे. या संबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. तसेच गुरूशिवाय आजही पर्याय नसल्याचे गुरू व शिष्यांनी शिक्षकदिनी नमूद केले.

गुरूंच्या ऋणातून शिष्य कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो वाटचाल करीत असतो. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातील सुजाण नागरिक, खेळाडू, कलाकार, लेखक, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीअर, शास्त्रज्ञ घडविण्याचे कार्य सतत सुरू असते. इंटरनेट, गुगल, यु-ट्यूब व विविध ज्ञानात भर घालणारे अ‍ॅपने माहिती मिळत असली तरी गुरूंचा सहवास प्रत्यक्षदर्शी असणे महत्वाचे असल्याचे ‘पुढारी’शी बोलाताना सांगितले.

हल्लीच्या पिढीप्रमाणे शिक्षकांनाही संगणक व तंत्रज्ञान अवगत आहे. इंटरनेट, गुगुल तसेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक शिक्षकांपेक्षा कमी नाहीत. ते आपल्याला अनेक अकल्पनीय गोष्टी सहजपणे शिकवतात. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळेल. परंतु जीवनात आवश्क नीतिमूल्ये, संस्कार व शिकवण हे फक्त शिक्षकच देऊ शकतो.
- जयश्री जगदाळे - न्यायाधीश

ज्ञान देण्याचे कार्य हे शिक्षकच करीत असतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळत असली तरी कृतियुक्त शिक्षण व वाचन हे शिक्षकच करून घेऊ शकतात. आजच्या प्रगत समाजाला पूर्वीसारखी आदरयुक्त भीती राहिली नाही.
- विद्या पेंसुलावर - मुख्याध्यापिका

पूर्वी विद्यार्थी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे समजून त्याची चतुरस्र प्रगती कशी होईल व तो आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे वागविले जायचे. यातून गुरू-शिष्य नाते केवळ शालेय जीवनापुरतेच मर्यादित न  राहता शेवटपर्यंत टिकायचे. हे आता फार अभावाने दिसत आहे. शिक्षकांविषयी आदर, प्रेम, आपुलकी हे ज्वलंत व संवेदनशील समाजचे सदृढ असण्याचे प्रतीक आहे.
- विलास लांडे (माजी आमदार)

इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. परंतु गुरूची जागा कोणी घेऊ शकत नाही. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करीत असतो.
- डॉ. अनू गायकवाड

गुरूंच्या प्रति असलेला आदर कमी होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खेळाडूला माहिती मिळते. परंतु त्याचा सराव, नैतिक आधार आणि आत्मविश्वास गुरूच वाढवू शकतो. खेळाडूच्या करिअरला दिशा देण्याचे काम गुुरूच करू शकतात.
- श्रीधरन तंबा, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक