Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Pune › मराठी भाषेला तंत्रज्ञानाची जोड

मराठी भाषेला तंत्रज्ञानाची जोड

Published On: Jul 13 2018 1:14AM | Last Updated: Jul 13 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी 

परंपरागत मराठी साहित्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी पहिल्यांदाच मराठी भाषेला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यासाठी ई-मेलच्या धर्तीवर ई-पत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. तर ‘मैत्री तंत्रज्ञानाशी’ या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शॉपिंग कसे करावे, याची ओळख होणार आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे विचार व अनुभव, तसेच अभिव्यक्तीला नव्या अभ्यासक्रमात प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे दहावीचा मराठीचा बदललेला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सांगड घालणारा, व्यवसायाभिमुख दृष्टिकोन तयार करणारा, ज्ञानरचनावादावर आधारित कृतियुक्त शिक्षणाचा पाया घालणारा असल्याचे मराठी विषय समितीच्या विशेष कार्यकारी अधिकारी सविता वायळ यांनी सांगितले.वायळ म्हणाल्या, यंदा प्रथमच प्रत्येक भागात 3 धडे, 2 कविता आणि 1 स्थूलवाचन  असे  चार भागात अनुक्रमणिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नामवंत साहित्यिकांच्या जुन्या, मध्यम आणि नवीन साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा व्यावसायिक दृष्टीने विचार करायला हवा. 

त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना कथालेखन, जाहिरात लेखन, बातमीलेखन, पत्रलेखन यांचा नमुना पत्रिकेच्या माध्यमातून सराव करण्यास शिकवण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषेच्या बाबतीत विद्यार्थी कुठे कमी पडू नयेत, यासाठी पहिली ते नववीच्या व्याकरणाची उजळणी घेण्यात आली असून, कार्यात्मक व्याकरण शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कवितांचे रसग्रहण आणि काव्यसौंदर्य, भाषासौंदर्याच्या माध्यमांतून शिकता येणार आहे.

मराठी भाषा विषयाच्या पुस्तकाच्या दृष्टिकोनाविषयी माहिती देताना वायळ म्हणाल्या, सध्या स्पर्धेच्या युगात भविष्याला सामोरे जाणारा विचारवंत, कृतिशील विद्यार्थी तयार करणे, विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी सहकार्यात्मक अध्ययन, सृजनशील विचार, चिकित्सक विचार, जीवनाभिमुखता, शिक्षणाची जीवनाशी सांगड या तत्त्वांचा स्वीकार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करावा तसेच आपल्या भावना, कल्पना, अनुभव, विचार स्वत:च्या भाषेत मांडावेत. यासाठी त्याच्या अभिव्यक्ती क्षमतेचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी मराठीला विषय म्हणून नव्हे तर, भाषा म्हणून प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक प्रश्‍नपत्रिकेकडून भाषाविकास करणार्‍या कृतिपत्रिकेकडे तर, पाठांतराकडून स्वत:च्या विचारांच्या अभिव्यक्तीकडे, ज्ञानाकडून आकलनाकडे, आशयाच्या आकलनाकडून भाषिक समृद्धीकडे जाण्यासाठी तयार करण्यात येणार आहे.

आजच्या पिढीचा विचार

पुस्तकाच्या रचनेत अभ्यासक्रमाची क्षमता, क्षेत्रे, क्षमता विधाने, अध्ययन निष्पत्ती यांच्या स्वरूपात नेमकेपणाने मांडणी केली आहे. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व भाषिक समृद्धी यास प्राधान्य देण्यात आले आहे. आशय, आकलनाच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांचा लेआऊट उत्तम करण्यात आला आहे. तज्ज्ञांबरोबर प्रत्यक्ष शिकवणार्‍या शिक्षकांचा पाठ्यपुस्तक निर्मितीत सहभाग घेऊन आजच्या पिढीला आवडेल, भावेल, आपला वाटेल, असा आशय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची भाषेची नाळ जोडलेलीच राहून तो आधुनिकतेची कास धरण्यास समर्थ होऊ शकेल.