Thu, Jul 16, 2020 08:55होमपेज › Pune › अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणीतही तांत्रिक गोंधळ

अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणीतही तांत्रिक गोंधळ

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:48AM

बुकमार्क करा

पुणे : गणेश खळदकर 

राज्यात शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणार्‍या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीचे काम शासनाकडून एका खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीला परीक्षा देत असलेल्या 1 लाख 98 हजार 169 विद्यार्थ्यांसाठी केवळ 69 केंद्रे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीचे केंद्र देता आले नाही. तर सर्व्हरमधील तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज देखील अर्धवट अवस्थेत भरले गेले आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी न्यायालयात गेले असून एजन्सीच्या सावळ्या गोंधळामुळे टीईटी परीक्षेनंतर आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत देखील तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. 

शासनाकडून परीक्षा घेण्यासाठी विविध एजन्सींची नेमणूक करण्यात येते. परंतु या एजन्सींकडून कामाची पूर्तता व्यवस्थित होतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक गोंधळाला सामोरे जावे लागते. असा प्रकार काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत घडला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात 12 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी शासनाने एका एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीला परीक्षा केंद्रांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांनी भरलेले पसंतीक्रम देता आले नाहीत.

या एजन्सीने काही विद्यार्थ्यांना न भरलेलेच पसंतीक्रम देण्याचा पराक्रम केला होता. परंतु, दैनिक ‘पुढारी’ने या एजन्सीची पोलखोल केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पहिल्या तीन प्राधान्यक्रमानुसार केंद्रे दिली आहेत. परंतु तरीदेखील विद्यार्थ्यांना घरापासून 200 ते 300 किलोमीटर दूरची केंद्रे मिळाली आहेत. हे विद्यार्थी या परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट भरले गेले असल्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षाच देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. यातीलच काही विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले आहेत.

यासंदर्भात एजन्सीच्याच एका व्यक्तीला जाब विचारला असता त्याने काम करण्यास कालावधीच कमी मिळाल्यामुळे हा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. तर विद्यार्थ्यांना त्याच शहरात केंद्र उपलब्ध करू देण्यासाठी आणखी केंद्र का वाढवले नाहीत, सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी का सोडविल्या नाहीत. या प्रश्‍नांची उत्तरे मी देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एजन्सीच्या सावळ्या गोंधळाचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे.

त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी परीक्षा परीषदेत तक्रारी घेऊन येत आहेत.परंतु या विद्यार्थ्यांना परीक्षेचे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय होत असल्याचे अजब कारण देत तसेच तुमच्याच चुका असल्याचे सांगत एजन्सीच्या अनागोंदी कारभारावर पांघरून घालण्याचे नेहमीचेच काम परीक्षा परीषदेतील अधिकारी करत आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा कारभार एका एजन्सीकडे देण्यात आल्यामुळे या परीक्षेच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले असताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मात्र खेळ होताना दिसत आहे.