Wed, Apr 24, 2019 01:46होमपेज › Pune › चांदणी चौकात अश्रूधुराचा वापर

चांदणी चौकात अश्रूधुराचा वापर

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 10 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

शहरात उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी चांदणी चौकात मुंबई-बंगळुरु महामार्ग  रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी  लाठीमार  करून अश्रूधुराचा नळकांड्या फोडल्या.  त्यानंतर शेकडोच्या संख्येने असलेला जमाव पांगला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते 

मराठा आरक्षणासाठी शहरात सकल मराठा समाजाने शांतते आंदोलन केले. मात्र  दुपारनंतर चांदणी चौकात ठिय्या आंदोलन संपल्यावर जमावाने झाडाच्या फांद्या, दगड टाकून  मुंबई -बंगळुरू महामार्ग अडविला. त्यानंतर पोलिसांनी महामार्ग मोकळा करून जमावाला तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर शेकडोच्या संख्येने असलेला जमाव पांगला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या घटनेत पाच ते सहा पोलिसांना दगड लागले असून, त्यांचे फोटो आणि व्हीडीओ पोलिसांकडे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

सकाळी आंदोलन शांततेत सुरु होते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि चांदणी चौकातील घटनेने याला गालबोट लावले. आंदोलनाच्या संयोजकांनी आंदोलन संपल्याचे जाहीर केल्यावरदेखील महामार्ग रोखण्यात आला. दगडफेक करणार्‍यांमध्ये तोंडाला रुमाल बांधून अनेकजण होते. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले. 

एक्स्प्रेस वेवर पाच तास अडकलो

उर्से टोलनाक्याजवळ आंदोलकांनी एक्स्प्रेस वे रोखून धरल्याने पुणे - मुंबई वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. ‘आम्ही मुंबईहून पुण्याकडे निघालो होतो. मात्र या ठिकाणी तब्बल पाच तास अडकून पडलो. 

अनेक कुटुंबे लहान मुलांसह होती. अमेरिकेहून आलेले पुण्याचे एक कुटुंबही अडकून पडले होते, अशी माहिती ‘पुढारी’चे वाचक राजू वाघमारे आणि हेमंत गवंडे यांनी कळवली. आंदोलकांशी संवाद साधला असता, ते आक्रमक वाटले नाहीत. कुणी आजारी असेल किंवा मोठी अडचण असेल तर त्यांना सोडून दिले जात होते, असे गवंडे यांनी सांगितले.