Sun, Nov 18, 2018 13:56होमपेज › Pune › देशातून ८० लाख टन साखर निर्यात करारासाठी सांघिक प्रयत्न

देशातून ८० लाख टन साखर निर्यात करारासाठी सांघिक प्रयत्न

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

देशात ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार्‍या ऊस गाळप हंगामात विक्रमी साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे अन्न सहसचिव सुरेशकुमार वशिष्ठ यांंच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाचे शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देऊन निर्यातीसाठी पुढाकार घेत आहे. त्यातून ऊस गाळप हंगाम 2018-19 मध्ये सुमारे 80 लाख टन साखर निर्यात करार करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

चालू वर्षीच्या गाळप हंगामात तयार होणार्‍या कच्च्या व रिफाइंड साखरेच्या निर्यातीसाठी केंद्राचे अन्न सहसचिव, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) आदींच्या शिष्टमंडळाने आतापर्यंत बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया येथे भेटी दिल्या आहेत. तेथील शासन, साखर उद्योग संघटनांबरोबर, साखर शुध्दीकरण कारखान्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संयुक्त चर्चा झालेली आहे. ब्राझीलने चालू वर्षी साखरेऐवजी इथेनॉलकडे उत्पादन अधिक वळविले आहे.

त्याचा फायदा भारतीय साखर निर्यात करून उचलता येणे शक्य आहे. त्यामुळे देशात अतिरिक्त ठरणारी साखर अन्य देशांना पाठवून देशांतर्गत साखरेचे भाव वाजवी पातळीवर स्थिरावण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्र व साखर उद्योगाचे शिष्टमंडळ लवकरच श्रीलंका, आखाती देश आणि चीनलाही साखरेच्या करारासाठी भेट देणार आहे. प्राथमिक माहितीनुसार बांगलादेशाला 22 ते 25 लाख टन, तर चीनला सुमारे 15 लाख टन साखरेची आवश्यकता आहे.