Tue, Jul 16, 2019 01:59होमपेज › Pune › ‘शिक्षकांना अशैक्षणिक कामे सक्तीची करा’

‘शिक्षकांना अशैक्षणिक कामे सक्तीची करा’

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

निवडणुकांपासून ते घरांमध्ये शौचालये आहेत की नाही, हे पाहण्याचे काम शिक्षकांवर सोपवले जाते. शैक्षणिक कामांपेक्षा अशैक्षणिक कामांमध्येच शिक्षकांचा जास्त वेळ जातो. या परिस्थितीला कंटाळलेले शिक्षक आता ‘शिक्षणाचे वाटोळे झाले तरी चालेल; मात्र यापुढे अशैक्षणिक कामे सक्तीची करा,’ या मागणीसाठी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघांचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांनी दिली आहे.न्यायालयाने शिक्षकांना अशैक्षणिक कामे ऐच्छिक आहेत, असे स्पष्ट करूनही शिक्षकांवर अशैक्षणिक कामांची सक्ती केली जाते. निवडणूक, जनगणना, शौचालयांची पाहणी अशा सगळ्याच कामांसाठी शिक्षकांवर भार टाकला जातो. 

या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वैतागून गेले आहेत. मात्र, न्यायालयाचे आदेश धुडकावून अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारण्यासाठी अधिकारी दमदाटी करतात अशा अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्यानंतर राज्यातील खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघाची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत शिक्षकांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून आता प्रत्यक्ष याचिका दाखल करणार आहेत.
यासंदर्भात गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांची, शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे, असा सरकारचा आग्रह असतो. मात्र, अशैक्षणिक कामांमध्ये एवढा वेळ जातो, की अध्यापनासाठी, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायचे कधी, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. शिक्षकांच्या समस्यांची कैफियत शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्तांपासून शिक्षण मंत्र्यांपर्यंतही मांडून झाली. कुणीच आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. आता न्यायालयात जाण्यावाचून पर्याय नाही.

सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारीही शिक्षकांवर आहे. वर्गात शिक्षक नसल्यास अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. शालेय कामकाज आणि अशैक्षणिक कामे करताना कामगार कायद्याचे आठ तासांच्या कामाच्या तरतुदीचे उल्लंघन होते. सरकारने अतिरिक्त कामाचा भत्ताही बंद केला आहे. त्यामुळे प्रत्येक अशैक्षणिक काम शिक्षकाने करायचे असेल, तर ते सक्तीचेच करा, अशी मागणी न्यायालयाकडे याचिकेद्वारे करणार असल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले.