Sun, Aug 25, 2019 00:17होमपेज › Pune › कचरा संकलनासाठी द्यावा लागणार कर

कचरा संकलनासाठी द्यावा लागणार कर

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील कचर्‍याचे शंभर टक्के संकलन करणे, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी आता पुणेकरांना कचर्‍यावर कर द्यावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात येत असून, तो एका महिन्यात महापालिकेच्या मुख्य सभेला सादर केला जाणार आहे, अशी मीहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली आहे. 

शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील कचर्‍याचे संकलन योग्य पद्धतीने केले जात नाही, वेळच्या वेळी कचर्‍याने भरलेले कंटेनर उचलले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. कचरा गोळा करणे, वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कमी पडत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ’सारख्या खाजगी संस्थेची मदत घेऊन कचरा गोळा करण्याचे व वर्गीकरण करण्याचे काम करत आहे. यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मिळकत करा प्रमाणे कचर्‍यावर देखील कर लावायचा आणि मिळकत करामध्येच तो वसूल करण्याचा प्रस्ताव प्रशासन आणत आहे.

सध्या कचरा घेऊन जाण्यासाठी नागरिकांकडून महिन्यालाय 30 रुपयांपासून 60 रुपये घेतले जातात. यामुळे प्रशासनाला वर्षांला कचर्‍यासाठी तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा खर्च होतो. परंतु नागरिकांकडून मात्र केवळ 200 कोटी पर्यंतच जमा होतात. यामुळे घरातील, घरासमोरचा, दुकानातील सगळ्याच कचर्‍यावर महापालिका ग्राहकांना कर लावणार आहे. यामधून येणार्‍या पैशातून शहरात शंभर टक्के कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

हा कर लावताना झोपटपट्टी पासून, प्रत्येत सदनिका, लहान-मोठे व्यावसायिक, हॉटेल, रुग्णालय, मंगल कार्यालय प्रत्येकाकडून हा कर वसूल करण्यात येणार आहे. यामध्ये कमर्शियल प्रॉपर्टीना अधिक कर लावण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येत असून, येत्या महिन्यात हा प्रस्ताव मुख्य सभेला सादर करण्यात येणार आहे.