Sun, May 26, 2019 13:09होमपेज › Pune › करवाढ फेटाळली; पुणेकरांना दिलास

करवाढ फेटाळली; पुणेकरांना दिलास

Published On: Feb 02 2018 1:43AM | Last Updated: Feb 02 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या 15 टक्के करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने गुरुवारी एकमताने फेटाळला. त्यामुळे पुणेकरांवरील करवाढीचे संकट टळले आहे. त्यामुळे आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक आणखीच गडगडले ते आणखी 135 कोटींनी कमी होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

 स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. पुढील आर्थिक वर्षासाठी (2018-19) मिळकतकरात 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला होता. स्थायी समितीने त्यावर निर्णय न घेता खाससभेकडे हा प्रस्ताव निर्णयासाठी टोलविला होता. गुरुवारी या प्रस्तावावर खाससभेत चर्चा झाली. या वेळी सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी करवाढ करण्यापेक्षा प्रशासनाने उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधून उत्पन्न वाढीवर भर द्यावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आयुक्तांचा 15 टक्केकरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. मात्र, समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाणीपट्टीत या वर्षासाठी 15 टक्के करवाढीस मुख्यसभेने गतवर्षीच मंजुरी दिली असल्याने पाणीपट्टीचा बोजा मात्र पुणेकरांना सहन करावा लागणार आहे. 

दरम्यान, करवाढ फेटाळल्याने करदात्या नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी त्याचा फटका पालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला बसणार आहे. आयुक्तांनी पुढील आर्थिक वर्षाचे 5 हजार 396 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात करवाढीचे 135 कोटींचे उत्पन्न गृहीत धरून हे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते, मात्र करवाढ फेटाळली गेल्याने हे अंदाजपत्रक आणखी 135 कोटींनी गडगडले आहे. विशेष म्हणजे उत्पन्न घटल्याने आयुक्तांनी चालू वर्षाच्या तुलनेत पुढील वर्षाचे अंदाजपत्रक आधीच 200 कोटींनी कमी केले होते. त्यात आता आणखी भर पडली आहे.