Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Pune › टाटा, कोयनाचे पाणी वळविण्यासाठी फेर अभ्यास समितीची स्थापना

टाटा, कोयनाचे पाणी वळविण्यासाठी फेर अभ्यास समितीची स्थापना

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी

टाटा तसेच कोयना जलविद्युत प्रकल्प समूहातून वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करून ते पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य शासनाने नऊ जणांची फेर अभ्यास समिती स्थापना केली आहे.  संबंधित समितीने तीन महिन्यांत  अहवाल सादर करावा, असेही शासनाने सांगितले आहे. या समितीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राबरोबरच उद्योग आणि पिण्यासाठी सध्या असलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी  मिळणार आहे. यासाठीचा अध्यादेश राज्य शासनाने जारी केला आहे.

टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी गेल्या  90 वर्षांपासून  जिल्ह्यातील मुळशी तसेच  इतर धरणांमधून प्रत्येक वर्षी अंदाजे  42.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येत आहे. या पाण्यापासून  वीजनिर्मिती करण्यात येते. हे पाणी भीमा  खोर्‍यामधील असून, हे खोरे पाणी तुटीच्या क्षेत्रामध्ये येत आहे. यातील  बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करून ते पुन्हा पूर्वेकडे वळविण्यविण्यात येत होते. त्याचप्रमाणे दरवर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे 67.50 टीएमसी व टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे 42.50 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येते. जिल्ह्यातील मुळशी आणि इतर धरणांतून वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे 42.50 टीएमसी इतके पाणी कोकणात जाते. त्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील दुष्काळी भागांना होत नाही.

कृष्णा पाणीतंटा लवादाने प्रती जलवषार्साठी खोर्‍याबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी आणि  मर्यादा ठरवून दिली आहे. तसेच राज्य जलनीतीनुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी वापरण्याचा क्रम ठरविण्यात आला आहे. याबरोबरच विविध पयार्यांद्वारे वीज उपलब्ध करणे व शक्य असल्याने पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीसाठीचे पाणी वळविण्याच्या आवश्यकतेबाबत फेर अभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबतचे अध्यादेश जारी केला आहे. ही समिती वीजनिर्मितीसाठी सध्याची निर्माण केलेली व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने उपयोगात आणण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. त्यामुळे कमी पाण्याचा वापर होऊन वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. जलविद्युत निर्मितीनंतर सोडण्यात येणारे पाणी कोकणात सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक कारणासाठी करण्यात येतो. अशा  स्थितीत पाणी बंद केल्यास या  भागासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. त्याअनुषंगाने सध्या वापरात येणार्‍या पाण्यासाठी कोकणातील जलस्रोतांचा विकास करण्यासाठी ही समिती सदस्य उपाययोजना सुचविणार आहे.

अभ्यास समितीमधील सदस्य पुढीलप्रमाणे

अ.पा.भावे (निवृत्त सचिव) जलसंपदा विभाग - अध्यक्ष 
श्री. ना. हुद्दार (निवृत्त सचिव)- सदस्य 
दि. मा. मोरे (निवृत्त महासंचालक, मेरी)- सदस्य
मुख्य अभियंता (स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणे - सदस्य
मुख्य अभियंता, जससंपदा विभाग पुणे - सदस्य
मुख्य अभियंता जलसंपदा कोकण - सदस्य
प्रधान सचिव (ऊर्जा विभाग) मंत्रालय, यांनी नियुक्त केलेला महाजनकोचा प्रतिनिधी- सदस्य
टाटा पॉवर कंपनी यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी - सदस्य
अधीक्षक अभियंता- पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे - सदस्य