Fri, Jan 18, 2019 23:40होमपेज › Pune › टाटा फायनान्सच्या स्टॉलची नागरिकांकडून तोडफोड

टाटा फायनान्सच्या स्टॉलची नागरिकांकडून तोडफोड

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 20 2018 10:59PMपिंपरी : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोफत घर मिळेल, अशी जाहिरात देऊन गृहकर्जाची माहिती देणार्‍या टाटा कॅपीटल फायनान्स या गृहकर्ज देणार्‍या कंपनीच्या प्रदर्शनाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. हा प्रकार पिंपरी येथील ऑटोक्लस्टर येथे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील ऑटोक्लस्टर येथे टाटा कॅपीटल  फायनान्स कंपनीने कर्जासाठी स्टॉल उभा केला होता; मात्र यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोफत घर मिळेल, अशी जाहिरात केली होती. यामुळे शनिवारी सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर येथे केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचे कळताच सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला.

नागरिकांचा सहनशीलतेचा बांध फुटला आणि संतप्त नागरिकांनी हल्लाबोल केला. हातात येईल ते साहित्य घेऊन नागरिकांनी टाटा कॅपीटल फायनान्स कंपनीच्या टेबल, खुर्च्या फेकून देण्याबरोबरच गृहकर्जाची माहिती देणारी पोस्टर्स फाडली.  यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पिंपरी पोलिस दाखल झाले. 

पिंपरीतील पालिकेच्या ऑटोक्लस्टरमध्ये हे प्रदर्शन भरले होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, गोंधळ घालणार्‍या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील; तसेच संबंधित कंपनीची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.